नायर रुग्णालयात करोनाबाधित महिलेची आत्महत्या

आत्महत्या करणारी महिला वरळीच्या जिजामाता नगरमधील होती.


मुंबई: ‘करोना’च्या संसर्गाबरोबरच लोकांमध्ये या आजाराची दहशतही वाढताना दिसत आहे. अहमदनगर, नाशिकनंतर आता मुंबईत एका २८ वर्षीय करोनाबाधित महिलेनं आत्महत्या केली आहे. नायर रुग्णालयात आज पहाटे चारच्या सुमारास तिनं गळफास घेतला.

आत्महत्या करणारी महिला वरळीच्या जिजामाता नगरमधील होती. नायर रुग्णालयातील वॉर्ड क्र. २५ मध्ये तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, करोना पॉझिटिव्ह असल्याचं समजल्यापासून तिला नैराश्य आलं होतं. त्यातूनच तिनं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.

याआधी नाशिकमध्ये एका गृहस्थानं करोना झाल्याच्या नुसत्या संशयावरून आत्महत्या केली होती. तर, नगरमधील अकोले येथे एकानं रुग्णालयात स्वत:ला संपवलं होतं.

करोनाग्रस्तांची संख्या वाढत असली तरी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत २५९ रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती उत्तम आहे. त्यामुळं कुणीही घाबरून जाण्याची गरज नाही, असं प्रशासनाकडून सातत्यानं सांगितलं जात आहे. तरीही अशा घटना घडत असल्यानं चिंता वाढली आहे.

 468 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.