कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्य पार्श्वभूमीवर सरकारी आदेशाचे केले पालन
ठाणे : कोरोनाचा जगभर उद्रेक झाला आहे. सबंध भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर डाॅ . बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरातच साजरी करण्याचे आवाहन रिपाइं एकतावादीचे अध्यक्ष नानासाहेब इंदिसेंनी केले होते. सोमवारी रात्री बारा वाजेच्या ठोक्याला इंदिसे यांनीही आपल्या निवासस्थानी महामानवांना अभिवादन करीत जयंती साजरी केली.
बाबासाहेबांनी देशाला प्रथम महत्व दिले होते. आज राज्यावर व देशावर आलेले हे संकट दूर करायचे असेल तर आपण प्रखर राष्ट्रभक्ताप्रमाणे घरात बसणे अत्यंत गरजेचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या अनुषंगाने आंबेडकरी जनता मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करीत असते. मात्र, हा जल्लोष साजरा करण्यापूर्वी आपण थोडे गंभीर होण्याची गरज आहे. जयंतीच्या जल्लोषासाठी रस्त्यावर आल्यास कोरोनाचे संकट अधिक गडद होऊ शकते. त्यामुळे घरातच आपल्या महापुरुषांसमोर नतमस्तक होऊन जयंती साजरी करावी, असे आवाहन नानासाहेब इंदिसे यांनी केले होते.
याच पार्श्वभूमीवर नानासाहेब इंदिसेंनी आपल्या निवासस्थानी शिव-शाहू-फुले-आंबेडकर या महामानवांना अभिवादन केले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टन्सींगचे भान राखले होते. या प्रसंगी भय्यासाहेब इंदिसे उपस्थित होते.
दरम्यान, ‘मी प्रथम भारतीय आणि अंतिमत: भारतीय’ असे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणाला सांगितले आहे. असे सांगणारे डॉ. बाबासाहेब हे राष्ट्रभक्त आहेत. त्यामुळे आता राज्य आणि देशावर आलेले कोरोनाचे महासंकट दूर सारण्यासाठी आपणही राष्ट्रभक्तीचा प्रत्यय देत देशाच्या भाग्यविधात्याची जयंती घरामध्येच वंदन करुन साजरी करावी; कोरोनामुळे आलेली संचारबंदी दूर झाल्यानंतर आपण सर्वजण शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांची जयंती सार्वत्रिक आणि मोठ्या उत्साहात साजरी करु, असे यावेळी नानासाहेब इंदिसेंनी सांगितले.
557 total views, 1 views today