पीपीई संदर्भातील केंद्राचा निर्णय डॉक्टरांच्या जीवावर उठणारा


गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारला फटकारले

ठाणे : केंद्र सरकारने पीपीई किट आणि मास्क आमच्या परवानगीशिवाय घेऊ नका, असे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे डॉक्टरांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्याबाबत महाराष्ट्राच्या भाजपने पत्रकार परिषद घेऊन हे सर्क्यूलर रद्द करण्याची मागणी करावी; वाधवान संदर्भात संबधित अधिकार्‍याला सक्तीच्या रजेवर पाठवले असताना त्याचे राजकारण करु नये, अशा शब्दात गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र भाजपला फटकारले आहे.
पीपीई किट खरेदी करण्यास केंद्र सरकारने महाराष्ट्राला मनाई केली आहे. त्याबाबत भाष्य न करणार्‍या भाजपने भलत्याच मुद्यावर राजकारण सुरु केले आहे. त्याबद्दल डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
डॉ. आव्हाड यांनी सांगितले की, कुठला तरी अधिकारी कोणाला तरी पत्र देतो आणि ती माणसे महाबळेश्वरला जातात. त्यामध्ये कोणाचा काही सबंध नाही. त्या अधिकार्‍याने ते मनाने केलेले आहे. पण, या सर्वांचा रोख शरद पवारांकडे वळविला जात आहे. शरद पवारांचे नाव घेतल्याशिवाय आपले दुकान चालणारच नाही, हे भाजपच्या नेतृत्वाला माहित आहे. यामध्ये पवारांचा काय सबंध? गेले ५० वर्षे भाजपवाले हेच करीत आहेत. कौतूक या गोष्टीचे करा की हे पत्र बाहेर आल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुखांकडे गेले; मुख्यमंत्र्यांकडे गेले; तत्काळ या दोघांनी चर्चा करुन रात्री बारा वाजता संबधित अधिकारी झोपेत असताना त्या अधिकार्‍याला सक्तीच्या रजेवर पाठवले. हे इतके सक्षम शासन आहे आणि ते शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आहे. आमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत; पण, आमचे भिष्माचार्य शरद पवार आहेत. असले फालतू लाड आम्ही करीत नाही. आता दुसरी गोष्ट अशी की, केंद्राचे एक पत्र आले आहे की, आमच्या परवानगी शिवाय तुम्ही पीपीई किट घ्यायचे नाही; मास्क घ्यायचे नाहीत; कोणतेही वैद्यकीय साहित्य घ्यायचे नाही. लोकं मरताहेत, पीपीई किट नाही म्हणून लोकं ओरडताहेत; आम्ही अजूनपर्यंत तोंड बंद ठेवलेले होते. आम्हला राजकारण करायचे करायचे नव्हते. पण, आता तुम्ही बोला की केंद्राने हे का केले. महाराष्ट्राच्या बद्दल काही कुटील हेतू आहे का त्यांच्या मनात? तेव्हा ताबडतोब हे सर्क्यूलर मागे घ्या, अशी मागणी करण्यासाठी भाजपवाले पत्रकार परिषद घेतील का? आमचे साहित्य आम्हाला आणू द्या, आमच्या डॉक्टरांची- चतुर्थश्रेणी कामगारांची आम्हाला काळजी आहे. आम्ही त्यांना ते देऊ द्या; महाराष्ट्राचा सगळा खजिना आम्ही कोरोनाच्या निर्मूलनासाठी वापरु आणि लोकांचे जीव वाचवू. पण, केंद्राने अशी आडकाठी आणून महाराष्ट्राला अडचणीत आणले आहे. हे नको तिथे, नको ते सबंध जोडून राजकारण करु नका, असेही डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

 607 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.