अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची नोंदणी सुरु

बदलापूर पालिकेतर्फे खबरदारीचा उपाय

बदलापूर : ‘कोरोना’ संकट काळातही ठाणे, नवी मुंबई, मुंबईत सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन, खबरदारीचा उपाय म्हणून बदलापूर पालिका प्रशासनाने शहरातून बाहेर अत्यावश्यक सेवेसाठी ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यास सुरूवात केली आहे.
संचारबंदीच्या काळात इतर सर्व व्यवहार ठप्प असले तरी अत्यावश्यक सेवेत असणारे हजारो कर्मचारी अजूनही ठाणे, मुंबईत ये-जा करीत आहेत. कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका पत्करून हे कर्मचारी सेवा देत आहेत. त्यात परिचारिका, आरोग्य सेवक, डॉक्टर्स, पोलीस कर्मचारी, वाहनचालक, बँकेचे कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, बेस्ट, कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमाने अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी मुंबई ते बदलापूर, ठाणे ते बदलापूर दरम्यान खास फेऱ्या सुरू ठेवल्या आहेत. बदलापूर रेल्वे स्थानकांच्या पूर्व आणि पश्चिम विभागातून दररोज पंधरा ते वीस मिनिटांच्या अंतराने मुंबई आणि ठाण्यासाठी या विशेष गाड्या सोडल्या जात आहेत.
अत्यावश्यक सेवेतील हे सेवक पुरेशी खबरदारी घेऊन प्रवास करताना दिसतात. बसमध्येही हे कर्मचारी अंतर ठेवून बसतात. मात्र यापैकी बरीचशी मंडळी अति जोखमीच्या परिसरात दिवसभर कार्यरत असतात. त्यामुळे बदलापूर मधून असे रोज ये जा करणारे किती अधिकारी व कर्मचारी आहेत याची खबरदारी म्हणून नोंदणी केली जात असल्याचे मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांनी सांगितले. त्यासाठी पालिकेने दोन व्यक्तींचा एक पथक अशी दहा पथके बदलापूर पूर्व आणि पश्चिम विभागात नेमली असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांनी दिली.
मुंबईत रुग्णालयातील परिचारिका, डॉक्टर्स आणि पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या जीवालाही धोका निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. बदलापूर शहरातून असे ये जा करणारे असंख्य नागरिक आहेत. शासनाने शक्य असेल अशा ठिकाणी म्हणजे मोठी रुग्णालये, पोलीस ठाणी आदी विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवासाची सोय केल्यास अशा अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्यांचा त्रास कमी होऊ शकेल. त्याच प्रमाणे रोज ये जा केल्याने कुठे चुकून त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला तर त्यांच्या कुटुंबियांनाही लागण होण्याची शक्यता असल्याचे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले. अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नोंदणी केल्याने पुढील उपचार करणे सोयीचे होऊ शकेल असेही कथोरे यांनी सांगितले.

 604 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.