शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
बदलापूर : शहरातील रिक्षा चालक व मालक बांधवांना आर्थिक साहाय्य त्यांच्या बँक खात्यामध्ये तातडीने जमा करण्यात यावे त्याच प्रमाणे विम्यामध्ये ५० % सवलत देण्यात यावी अशी आग्रही मागणी शिवसेना शहर प्रमुख आणि माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लॉक डाऊन सारखे अनेक चांगले मोठे निर्णय घेतले असून महाराष्ट्रातील सर्व नागरिक त्याचे काटेकोर पालन करीत आहे. यात बदलापूर मधील रिक्षा चालक आणि मालकही सक्रिय सहभागी झालेले आहेत असे वामन म्हात्रे यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याना लिहिलेल्या निवेदनात म्हटले आहे. मात्र बदलापूर शहरातील रिक्षा चालक बांधवांवर या लॉक डाऊन चा विपरीत परिणाम होताना दिसत आहे. रोजचा दैनंदिन खर्च, मुलाबाळांच्या शिक्षणाचा खर्च, कर्जाचे हप्ते या सारख्या गोष्टींचे हप्ते सामान्य रिक्षा बांधवांना भरणे जड झाले आहेत. त्यात २५ दिवस काम बंद असल्यामुळे त्यांचे जगणे मुश्किल झाले असल्याचे वामन म्हात्रे यांनी या निवेदनात निदर्शनास आणून दिले आहे.
महाराष्ट्र व केंद्र सरकार सर्वच स्थरातील समाजाला, नोकरवर्ग, बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या वर्गास मदत जाहीर करीत आहे. बदलापूर मधील तसेच राज्यातील रिक्षा चालक व मालक बांधवांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये यासाठी त्यांना तातडीने आर्थिक मदत रिक्षा चालक व मालक यांच्या खात्यात जमा करण्यात यावी. त्याच प्रमाणे रिक्षाच्या इन्शुरन्स मध्ये ५० % सवलत देण्यात यावी अशी मागणी वामन म्हात्रे यांनी आपल्या निवेदनात केली आहे.
538 total views, 1 views today