एपीएमसीतील मालाच्या आवक-जावकचे नियोजन होणार


माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी घेतला आढावा

नवी मुंबई : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता आशिया मधील सर्वात मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गर्दी टाळण्यासाठी येथे येणाऱ्या मालाची आवक आणि जावक चे योग्य नियोजन करण्याची सूचना माजी खासदार डॉक्टर संजीव गणेश नाईक यांनी केली आहे.
डॉक्टर नाईक यांनी बुधवारी तुर्भे येथील दाणाबंदर बाजारात दाणाबंदर मार्केटचे संचालक निलेश वीरा, ग्रोमा चे सचिव अमृतलाल जैन, नवी मुंबई चे एफ.डी.ए(अन्न व औषधं प्रशासन विभाग) उपायुक्त महेश चौधरी, नवी मुंबईचे अन्न सुरक्षा अधिकारी  संतोष शिरोसिया, विविध व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. या बैठकीत एपीएमसी मधील गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना सुचविल्या.
मुंबई महानगर क्षेत्रातील सुमारे दोन कोटी लोकसंख्येची भिस्त भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी नवी मुंबईतील एपीएमसी वर आहे. मुंबई, ठाणे ,पनवेल ,उरण नवी मुंबई लगतच्या सर्व शहरांमधील किरकोळ विक्रेते माल खरेदीसाठी एपीएमसीत येत असतात. कोरोनामुळे झालेल्या लॉक डाऊन च्या पार्श्वभूमीवर न केवळ विक्रेते तर या शहरांमधून नागरिकही मोठ्या संख्येने एपीएमसीमध्ये रोजच्या रोज खरेदीसाठी येत आहेत. परिणामी बाजाराच्या आवारात गर्दीवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले असून सामाजिक सुरक्षित अंतर राखले जात नाही. दररोज २०० गाड्या भाजीपाला माल येणे अपेक्षित असताना तब्बल एक हजार गाड्या रोज येत आहेत.  बाजार प्रशासनावर त्याचा ताण पडतो आहे. त्यामुळे एपीएमसीमध्ये  जर येणाऱ्या आणि जाणाऱ्या मालाचे योग्य प्रकारे नियोजन केले तर मुंबईसह इतर शहरांना देखील पुरेसा, आवश्यक आणि सुरळीत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करता येईल असे मत डॉक्टर नाईक यांनी मांडले. जीवनावश्यक वस्तू सुरळीतपणे मिळण्याबरोबरच त्या योग्य  दरामध्ये
नागरिकांना मिळायला हव्यात असेही ते म्हणाले. आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबई महापालिका, एपीएमसी प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या योग्य समन्वयातून  कोरोना विषयक खबरदारी पाळून एपीएमसीत नियोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. एपीएमसी प्रशासनाने भाजीपाला खरेदीसाठी बाजारात होणारी झुंबड लक्षात घेता भाजीपाला मार्केट खारघर येथे स्थलांतरित केलेले आहे त्यामुळे भाजीपाला मालाच्या काही गाड्या सध्या खारघर येथे जात आहेत परिणामी एपीएमसी मधील गर्दी काही प्रमाणात कमी झालेली आहे. नवी मुंबई महापालिकेने देखील शहरातील मोठ्या मैदानात भाजीपाला विक्री केंद्र सुरू केली आहेत. याठिकाणी सामाजिक सुरक्षितता अंतर राखून नागरिक दररोज भाजीपाला खरेदी करीत आहेत.
भाजीपाला मार्केटचे संचालक शंकर पिंगळे ,कांदा बटाटा मार्केटचे संचालक अशोक वाळुंज, फळ मार्केटचे संचालक संजय पानसरे, दाणा मार्केट चे संचालक नीलेश वीरा ही मंडळी दररोज एपीएमसी प्रशासन , पोलीस आणि  कोकण विभागीय शासकीय अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेत असून एपीएमसी मधील रोजच्या नियोजनाबद्दल तसेच बाजार आवारातील व्यवस्थेमध्ये असलेल्या उणिवा दूर करण्याबाबत
निर्णय घेतले जात आहेत. या सर्व उपाययोजनांवर आमचे बारीक लक्ष असून कोरोना महामारी विरोधातील युद्ध जिंकण्यासाठी नागरिकांनी प्रशासकीय यंत्रणांना सहकार्य करून त्यांच्या सूचनांचे पालन करावे , असे आवाहन डॉक्टर नाईक यांनी केले आहे.

एनएमएमटीची विशेष बससेवा सुरू करणार
एपीएमसी ते डोंबिवली विशेष एनएमएमटी सेवा….
एपीएमसी मधील सुमारे ३०० कर्मचारी डोंबिवली येथून येणारे आहेत. कोरोना च्या पार्श्वभूमीवर त्यांना सुरक्षितपणे एपीएमसीत आणण्यासाठी आणि परत सोडण्यासाठी एनएमएमटीची विशेष बससेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी या बैठकीत दिली. महापौर जयवंत सुतार यांच्या आदेशानुसार विशेष बसेस मध्ये सामाजिक सुरक्षितता अंतराचे (social distancing)काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे. एका बसमध्ये केवळ २५ प्रवासी प्रवास करू शकतात, असे त्यांनी सांगितले. 

सामाजिक सुरक्षितता अंतर काटेकोरपणे पाळून नागरिकांच्या सुविधेसाठी दाणाबंदर मार्केट सुरू ठेवावे. जीवनावश्‍यक वस्तूंची  भाववाढ न करता पुरेशा प्रमाणात  रास्त दरात  आणि सुरळीतपणे या वस्तू नागरिकांना उपलब्ध करून द्याव्यात, अशी सूचना बाजारातील सर्व घटकांना केली आहे.
– डॉक्टर संजीव नाईक, माजी खासदार

 489 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.