पोलीसांसाठी मास्क वाटप, भोजन पाण्याची व्यवस्था

सुभाष भोईर फौंडेशनचा उपक्रम

ठाणे : कोरोना व्हायरसचा वाढलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्यशासनाने लॉकडाऊनची घोषणा करूनही नागरिकांची रस्त्यावरील गर्दी काही केल्या कमी होत नाही. रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी पोलीस बांधव अहोरात्र मेहनत घेत असताना पोलिसांचे देखील सरंक्षण होणे गरजेचे आहे. त्याकरिता माजी आमदार सुभाष भोईर यांच्या पुढाकाराने सुभाष भोईर फौंडेशनच्या वतीने शीळ, दिवा, मुंब्रा, मानपाडा पोलीस स्टेशन तसेच वाहतूक पोलिसांना मास्कचे वाटप करण्यात आले. त्याच बरोबर पोलीस तसेच शासकीय कर्मचारी, वाहतूक पोलिसांना भोजन आणि पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.           कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातील दिवा विभाग, शीळ डायघर व मानपाडा पोलीस स्टेशन  त्याचप्रमाणे कल्याणफाटा, मानपाडा वाहतूक पोलीस,  मुंब्रा, शीळ अग्निशमन केंद्राचे अधिकारी व कर्मचारी, शासकीय कर्मचारी आणि निराधार व्यक्तींना गुढीपाडव्यापासून दररोज एक हजार जेवणाचे पॅकेट तसेच पाण्याची व्यवस्था सुभाष भोईर फौंडेशनच्या वतीने करण्यात येत आहे. जो पर्यंत संचारबंदीची अंमलबजावणी करण्यात येत आहे तो पर्यंत ही सेवा पुरविण्यात येणार आहे.          पोलीस बांधव व शासकीय कर्मचारी कोरोना या संसर्गजन्य महामारीला हटविण्यासाठी जोखीम पत्करून सेवा बजावीत आहेत. या सर्व  अधिकारी व कर्मचाऱ्यांना उन्हा तान्हात उभे राहून सेवा बजावावी लागत आहे. त्यामुळे माणुसकीच्या दृष्टिकोनातून पाहता या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोय उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे आहे आणि सामाजिक जीवनात वावरत असताना सेवेमध्ये आपलाही हातभार असावा म्हणून पोलीस बांधव तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना सोय उपलब्ध करून देणे हे आपले कर्तव्य असल्याचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी सांगितले. 

 460 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.