“बाहर से कोई अंदर ना आ सके, अंदर से कोई बाहर न जा सके . . . “


ग्रामीण भागात कडक संचार बंदी : ग्रामस्थांनीच केले रस्ते बंद
बदलापूर : ऋषी कपूर आणि डिंपल यांच्या बॉबी चित्रपटातील “बाहर से कोई अंदर ना आ सके, अंदर से कोई बाहर न जा सके . . . ” या गाण्याची आठवण आज ग्रामीण भागातून फिरताना येत होती. बदलापूर आणि आसपासच्या ग्रामीण भागातील गावात आणि गावपाड्यात जाणाऱ्या सर्व वाटा रस्ते हे ग्रामस्थानीच बंद करून पंतप्रधानांनी पुकारलेल्या संचारबंदीला सक्रिय पाठिंबा दिलेला पहावयास मिळाला.
जगभर कोरोना या विषाणूने हैदोस घातला आहे. या महामारीपासून बचाव करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांची संचार बंदी पुकारली. या संचार बंदीला बदलापूरच्या आसपासच्या बहुतेक सर्वच गाव पाड्यात जाणाऱ्या रस्त्यांवर बंदी घालून ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने सक्रिय सहभाग घेतलेला पहावयास मिळाला.
या ग्रामीण भागातील अनेक जण मुंबई पासून देश परदेशात बाहेर गावी नोकरी व्यवसायासाठी गेले आहेत. अनेक जण गावाकडे कमी येत असतात. मात्र या संचार बंदी मुळे बाहेरगावातील माणसांबरोबर विषाणू गावात येऊ नये याची खबरदारी घेण्यासाठी बहुतेक सर्वच ठिकाणी ग्रामस्थांनी स्वतःहून पुढाकार घेऊन गाव पाड्यात प्रवेश करणाऱ्या रस्त्यांवर दगड धोंडे, सुकलेली पडलेली झाडे, जुने फलक, गाडी चे टायर आदी वस्तू टाकून रस्ते बंद केले आहेत. गावातून कोणीही बाहेर पडू नये आणि गावात बाहेरून आत येऊ नये यासाठी हे रस्ते बंद करण्यात आले आहेत. बाहेरच्या जगाशी संपर्कच राहिला नाही तर विषाणू येण्याचा प्रश्नच उदभवणार नाही हि भावना या ग्रामस्थांची दिसून आली आहे. केवळ रस्त्याच्या प्रवेशाच्या ठिकाणी अडथळे उभारून ग्रामस्थ थांबले नसून आळी पळीने गावातील नागरिक गटा गटाने उभे राहून काळजी घेत आहेत.
मुरबाड मतदार संघ हा कोरोना पासून मुक्त रहावा यासाठी प्रत्येक गाव आणि पाडे वस्ती मध्ये जनजागृती केली आहे. अंबरनाथ, कल्याण आणि मुरबाड या तीन तालुक्यातील सुमारे ३७० गावं आणि सुमारे ३०० पाडे यामध्ये हि जनजागृती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे माझ्या या मतदार संघातील आदिवासी आणि कातकरी समाजाने कोणताही विरोध न करता संचारबंदीमध्ये स्वतःहून सहभाग घेतला आहे याचे मनापासून समाधान वाटते असे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले. तिन्ही तालुक्यात सर्व रेशन दुकानातून गावातील गरिबांना पुरेसे धान्य मिळावे यासाठीही तरतूद केलेली असून येत्या दोन दिवसात या नागरिकांना दोन महिन्याचे रेशन देण्याबाबत सूचना देण्यात आल्या असल्याचेही आमदार किसन कथोरे यांनी सांगितले. नागरिकांनीही विनाकारण रस्त्यांवर अथवा दुकानांमधून गर्दी करणे टाळावे, अन्न धान्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याने नागरिकांनीही स्वतःहून सुरक्षित अंतर ठेवावे असे आवाहन आमदार किसन कथोरे यांनी केले आहे.पंतप्रधानांनी आवाहन केल्या नंतर सर्व ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन आम्ही स्वयंस्फूर्तीने गावात येणारे रस्ते अडथळे टाकून बंद केले आहेत. बाहेरून कोणीही गावात येऊ दिले जात नाही. त्यामुळे कोरोना पासून मुक्ती मिळेल असे रहाटोली गावचे सरपंच सुखदेव गायकवाड यांनी सांगितले.

 694 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.