कल्याण परिमंडलात वीज कर्मचाऱ्यांना प्रतिबंधात्मक साहित्य वाटप

मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांचा पुढाकार

सतर्क राहून काम करण्याच्या सूचना

कल्याण : कोरोना विषाणू फैलावाच्या पार्शवभूमीवर अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या कल्याण परिमंडलातील वीज कर्मचाऱ्यांनी अधिक सतर्क राहून काम करण्याच्या सूचना मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी दिल्या आहेत. त्यासोबतच अखंडित वीजपुरवठा, वसुली व थकबाकीदारांची वीज खंडित करण्याच्या जबाबदाऱ्या पार पाडताना खबरदारीचा उपाय म्हणून कर्मचाऱ्यांना अग्रवाल यांच्या हस्ते प्रतिबंधात्मक साहित्यांचे वाटप करण्यात आले.

अत्यावश्यक सेवेतील वीज कर्मचाऱ्यांसाठी मार्चअखेर हा वसुलीच्या अनुषंगाने खूप अटीतटीचा महिना असतो. अखंडित वीजपुरवठ्याची जबाबदारी पार पाडताना वसुली व थकबाकीदारांची वीज खंडित करण्याचे दुहेरी काम कर्मचारी, अभियंते व अधिकाऱ्यांना करावे लागते. मुख्य अभियंता अग्रवाल यांनी ही बाब लक्षात घेऊन शनिवार व रविवारी सुटीच्या दिवशी व त्यानंतर सोमवारी स्वतः फिल्डवर उतरत प्रत्यक्ष काम करणाऱ्या कर्मचारी, अधिकारी व अभियंते यांना सॅनिटायझर्स, मास्क आदी प्रतिबंधात्मक साहित्याचे वाटप केले. दररोज सकाळी बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेऊन चर्चा करावी व कोरोना विषाणू संसर्गाची लक्षणे आढळल्यास तातडीने तपासणीला घेऊन जाण्यासाठीची यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. याशिवाय वीज ग्राहकांनी महावितरणने उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचा लाभ घेऊन घरबसल्या ऑनलाईन वीजबिल भरावे तसेच तक्रारींसाठीही टोल-फ्री क्रमांक, संकेतस्थळ व अँपचा वापर करावा व गर्दी टाळून सहकार्य करण्याचे आवाहन अग्रवाल यांनी केले आहे.

त्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हे

एप्रिल २०१९ ते फेब्रुवारी २०२० अखेर कल्याण परिमंडलात वितरित विजेचे सुमारे १४६ कोटी रुपये वसूल होणे बाकी आहेत. त्यासोबतच चालू वीजबिलाची वसुली व महिना अखेर त्यात पडणारी थकबाकीची भर यांची वसुली आर्थिक वर्षाच्या अखेरीस होणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे परिमंडलात थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची व वसुली मोहीम तीव्रतेने सुरु आहे. उल्हासनगर, विरार, पिंपळास (भिवंडी), कल्याण (पश्चिम) या भागात कर्तव्यावर असलेल्या वीज कर्मचाऱ्यांना मारहाण, शिवीगाळीच्या घटना गेल्या आठ ते दहा दिवसांत सलगपणे घडल्या आहेत. संबंधित हल्लेखोरांवर अजामीनपात्र कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. परिमंडलातील ग्राहकांना सहकार्य करण्याचे आवाहन करतानाच मुख्य अभियंता अग्रवाल यांनी कायदा हातात घेऊन कर्मचाऱ्यांना मारहाण, शिवीगाळ करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करून कडक शिक्षेसाठी पाठपुरावा करण्याचा इशारा दिला आहे.

 601 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.