कापडबाजार, रेल्वे स्टेशन रस्ता टाकणार कात

पनवेल संघर्ष समितीने महापालिकेचे वेधले लक्ष
.
पनवेल: कोहिनूर नाक्यापासून रेल्वे स्टेशनकडे जाणारा आणि खरे नाका ते मिरची गल्लीपर्यंतचा कापड बाजार तसेच जोशी आळीतील रस्त्याची डागडुजी करण्यासाठी पनवेल संघर्ष समितीने आज महापालिकेच्या बांधकाम खात्याला राजी केले. पुढच्या आठवड्यात त्या कामांना प्राधान्य देण्यात येईल असे मुख्य शहर अभियंता सुधीर कटेकर यांनी सांगितले.
कोहिनूर नाक्यापासून झोपडपट्टीच्या मध्यभागातून रेल्वे स्टेशनला जाणाऱ्या रस्त्याचे फ्लेव्हर ब्लॉक उखडले गेले आहेत. पावसाळ्यात तर गुडघाभर पाणी साचत असल्याने तारेवरची कसरत करत मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या चाकरमानींचे हाल होताना दिसतात. पाण्याचा निचरा होण्यासाठी गटार व्यवस्था नसल्याने रस्ते खराब होत आहेत.
कोहिनूर नाकासमोरील रस्ता फ्लेव्हर ब्लॉकने आणि पुढे साईबाबा मंदिरापासूनचा रेल्वे स्टेशनपर्यंतचा रस्ता कॉंक्रीटीकरण करण्यात येणार आहे. आज दुपारी कटेकर यांच्याशी पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी चर्चा करून या प्रमुख रस्त्यांच्या कामाची मागणी केली. त्याला प्राधान्य देण्याचे कटेकर यांनी मान्य केल्याने शहरातील महत्वाच्या रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
रेल्वेने प्रवास करणाऱ्या चाकरमानींनी कांतीलाल कडू यांच्याकडे या रस्त्यांसाठी अनेकदा तक्रार केली होती. त्या अनुषंगाने कडू यांनी हा रस्ता करण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांना साकडे घातले आहे.
कापडबाजार हा पनवेल शहरातील महत्वाच्या रस्त्यापैंकी एक असून अरुंद रस्ता, दुतर्फा दुकाने आणि वाढीव शेडमुळे तिथे डांबरीकरणाला वाव मिळत नाही. शिवाय रस्ता रुंदीकरण प्रकल्पात हा रस्ता अडकल्याने त्याची डागडुजी झालेली नाही. रस्ता रुंदीकरण आणि शहर नियोजन न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्याने त्या रस्त्याचे रुंदीकरण इतक्यात शक्य नसल्याचा दावा कडू यांनी करून तूर्तास डागडुजी करावी अशी मागणी केली. तसेच झवेरी बाजारातील जोशी आळीच्या रस्त्यावरही तातडीने फ्लेव्हर ब्लॉक बसावावे असे सुचवले असता, पुढच्या आठवड्यात तीनही रस्त्यांचे काम मार्गी लावण्याचे आश्वासन कटेकर यांनी कडू यांना दिल्याने वर्षानुवर्ष रखडलेले हे रस्ते आता पनवेल संघर्ष समितीच्या प्रयत्नांमुळे कात टाकणार हे निश्चित झाले आहे.

 483 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.