ती महोत्‍सवात यंदा बचतगट बाजारपेठसह महाराष्‍ट्राच्या खाद्यजत्रेची पर्वणी

मोफत आरोग्‍य तपासणी, योग स्‍पर्धा, नृत्‍य स्‍पर्धा,पाककला स्‍पर्धा आणि गुणवंत महिलांचा सत्‍कार

ठाणे गौरव सेवा प्रतिष्‍ठान आणि समर्थ भारत व्‍यासपीठाचा संयुक्‍त उपक्रम

ठाणे : महिला बचतगटांना बाजारपेठ मिळावी, महिलांमधील कला गुणांना वाव मिळावा व गुणवंत महिलांचा गौरव व्‍हावा यासाठी आंतरराष्‍ट्रीय महिला दिनाच्‍या निमित्‍ताने आयोजित होत असलेल्‍या ती महोत्‍सावात यंदा भव्‍य बचतगट बाजारपेठेसह योग स्‍पर्धा, नृत्‍य स्‍पर्धा, पाककला स्‍पर्धा, टाकाऊतून टिकाऊ वस्‍तू स्‍पर्धांसह महाराष्‍ट्राची खादयजत्रेची पर्वणी ठाणेकरांना अनुभवता येणार आहे. याचबरोबर तीन्‍ही दिवस मोफत आरोग्‍य तपासणीचे आयोजन करण्‍यात आले आहे. ठाणे गौरव सेवा प्रतिष्‍ठान व समर्थ भारत व्‍यासपीठ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने हा शुक्रवार ६ ते रविवार ८ मार्च दरम्‍यान शिवाजी मैदान, जांभळीनाका, ठाणे येथे महोत्‍सव आयोजित करण्‍यात आला असुन महोत्‍सवाचे हे सहावे वर्ष आहे.


बचत गटांच्या उत्पादनांची भव्य ग्राहक पेठ, विविध स्पर्धा गुणवंत महिलांचा सत्कार आणि महाराष्ट्राची खाद्यजत्रा अशा कार्यक्रमांची रेलचेल यंदाच्या ती महोत्सवात असणार आहे. शुक्रवार ६ मार्च रोजी महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर पल्लवी कदम, भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा माधवी नाईक, भाजपा ठाणे शहर उपाध्यक्ष डॉ. राजेश मढवी, नगरसेविका प्रतीभा मढवी, समर्थ भारत व्यासपीठाचे संचालक उल्हाल कार्ले, अजय जोशी, शिक्षणाधिकारी संगीता भागवत, ठामपा विरोधी पक्षनेत्या प्रमीला केणी, महिला आणि बालकल्याण समिती सभापती जयश्री डेव्हिड यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी ४ वाजता शिवाजी मैदान जांभळी नाका येथे महोत्सवाचे उद्‍घाटन होणार आहे. रविवार ८ मार्च पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात योग स्पर्धा, नृत्य स्पर्धा, पाककला स्पर्धा, टाकाऊ पासून टीकाऊ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. समारोपाच्या दिवशी रविवार ८ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता मॅगसेस पुरस्कार विजेत्या सामाजिक कार्यकर्त्या निलीमा मिश्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध क्षेत्रातील गुणवंत महिलांचा सत्कार केला जाणार आहे. समारोप समारंभास आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, नगरसेवक संदीप लेले, भाजपा ठामपा गटनेते संजय वाघुले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

ती महोत्सवात आनंदवनातील कुष्ठरोगी बांधवांनी बनवलेल्या वस्तूंचा स्टॉल असणार असन त्याव्यतिरीक्त बचत गटांची घोंगडी, पापड, लोणची, आभुषणे, कपडे, चॉकलेट, सौंदर्य प्रसाधने आयुर्वेदीक उत्पादने यांच्यासह विविध उत्पादनांचे स्टॉल मांडण्यात येणार आहेत. भारतीय आयुर्विमा महामंडळ, समाजविकास विभाग, महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, ठाणे जनता सहकारी बँक यांच्यासह विविध विभागांचे महिला विषयातील योजनांची माहिती देणारे स्टॉल मांडण्यात येणार आहेत.

ती महोत्सवात यंदा महाराष्ट्राची खाद्यजत्रा हे विशेष आकर्षण असून यात महाराष्ट्रातील पारंपरिक पदार्थांची चव नागरिकांना चाखता येणार आहे. शाकाहारी व मांसाहारी दोन्ही प्रकारांत विविध खाद्यपदार्थ ती महोत्सवातील खाद्य जत्रेत खवय्यांसाठी उपलब्ध असणार आहेत. खाद्य जत्रेसोबतच लहान मुलांच्या मनोरंजनासाठी फन-फेअर व खेळ मेला देखील ती महोत्सवात असणार आहे. ती महोत्‍सवाच्‍या तीन्‍ही दिवशी सकाळी १० दुपारी १ यावेळेत मोफत आरोग्‍य तपासणीचे आयोजन करण्‍यात आले असुन यात दंत चिकित्‍सा, नेत्र चिकित्‍सा, मधुमेह व रक्‍तदाब तपासण्‍या केल्‍या जाणार आहेत. तरी महोत्सवाला जास्तीत जास्त ठाणेकरांना उपस्थित रहावे असे आवाहन ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. राजेश मढवी व समर्थ भारत व्यासपीठाच्या वतीने संचालक उल्हास कार्ले यांनी केले आहे.

 663 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.