मनीष आडविलकर्स “परळ श्री’ विजेता होणार रॉयल एनफिल्डवर स्वार

मुंबई शहरच्या स्थानिक शरीरसौष्ठवपटूंसाठी १  मार्चला स्पर्धेचे आयोजन

मुंबई : कुलाब्यापासून शीवपर्यंत आणि पश्चिमेला माहीमपर्यंत राहात असलेल्या अस्सल मुंबईकर शरीरसौष्ठवपटूला मनीष आडविलकर्स “परळ श्री’ च्या निमित्ताने रॉयल एनफिल्डवर स्वार होण्याची संधी मिळणार आहे. शरीरसौष्ठवपटूंचा गॉडफादर, आदर्श बनलेल्या मनीष आडविलकरने मुंबईकर शरीरसौष्ठवपटूंच्या प्रेमाखातर येत्या १ मार्चला परळच्या कामगार मैदानात आयोजित केलेल्या मनीष आडविलकर्स “परळ श्री’ स्पर्धेत दोन लाखांच्या रोख बक्षीसांसह रॉयल एनफिल्डची पाऊणे दोन लाखांची क्लासिक ३६०  ही रॉयल बाईक देण्याचे जाहीर केले आहे. विशेष म्हणजे प्रतिष्ठेच्या मुंबई श्री आणि महाराष्ट्र श्रीच्या तोडीचा पुरस्कार मनीष आडविलकर्स “परळ श्री’ हा स्थानिक स्पर्धेला दिला जाणार असल्यामुळे मुंबईकर शरीरसौष्ठवपटूंची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यंदा टॉप ट्वेण्टीसह  फिटनेस फिजीक आणि दिव्यांगाच्या स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. २०१८  सालापासून सुरू झालेल्या मनीष आडविलकर्स “परळ श्री’ स्पर्धेच्या गतवर्षीच्या आयोजनाने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. मुंबई शहरातल्या खेळाडूंसाठी असलेल्या या स्पर्धेच्या तीन दिवस आधी स्पर्धा आयोजक मनीष आडविलकरने परळ श्री विजेत्यासाठी रॉयल एनफिल्डची घोषणा करून खळबळ माजवली होती. एका स्थानिक स्पर्धेला आजवर इतकं मोठं बक्षीस कुणीच दिलं नव्हतं. पण जे इतर कुणाला जमत नाही, तेच करून दाखविण्याची क्षमता असलेल्या मनीषने यंदाही तोच धमाका करणार असल्याचे सांगितले.

जे मुंबई शहरच्या हद्दीत राहतात, त्यांनाच संधी

मनीष आडविलकर्स “परळ श्री’चा साधा नियम आहे. जे खेळाडू मुंबई शहरच्या हद्दीत म्हणजेच कुलाबा ते शीव आणि कुलाबा ते माहिम या हद्दीत राहतात, त्याच खेळाडूंना खेळता येणार. यासाठी सर्वांना आपल्या निवासाचा दाखला म्हणून आधारकार्ड आणणे बंधनकारक असेल. मात्र एखादा खेळाडू या मुंबई शहरात भाडेकरू म्हणून राहतोय आणि आधारकार्डवर त्याचा पत्ता मुंबई शहरच्या बाहेरचा असेल तर अशा खेळाडूला स्पर्धेत संधी मिळणार नाही. हा नियम सर्वांना बंधनकारक असेल आणि आम्ही याचे काटेकोरपणे पालन करणार असल्याची माहिती मनीष आडविलकरने दिली.

दिनेश पुजारींकडून रॉयल एनफिल्डचा पुरस्कार

शरीरसौष्ठवच्या प्रेमापोटी गतवर्षी रॉयल एनफिल्डचा रॉयल पुरस्कार देणाऱ्या क्रीडाप्रेमी दिनेश पुजारी याही वर्षी मनीष आडविलकर्स “परळ श्री’ विजेत्याला रॉयल एनफिल्ड देऊन गौरविणार आहेत. रॉयल एनफिल्ड हे स्पर्धेचे खास आकर्षण असले तरी स्पर्धेतील अव्वल २०  खेळाडूंना रोख पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.  विजेत्या एनफिल्ड तर उपविजेत्या २५  हजार रूपयांचे रोख इनाम दिले जाणार आहे. त्यानंतर ३  ते ९  क्रमांकाच्या खेळाडूंना क्रमशः २० ,१५ , १० , ८ , ६ , ५ , ४ , ३  हजार रूपये अशी रोख बक्षीसे दिली जाणार असून 10 ते 20 क्रमांकाच्या खेळाडूंना प्रत्येकी 2 हजार रूपयांचे बक्षीस मिळेल. पुरूषांच्या फिटनेस फिजीकमध्ये  अव्वल सहा खेळाडूंना १० , ८ , ६ , ४ , ३  आणि २  हजार रूपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. दिव्यांग खेळाडूंनाही ५ , ४ , ३ , २ , १  हजार रूपये रोख पुरस्कार देऊन प्रोत्साहित केले जाईल. त्याचबरोबर स्पर्धेतील सर्वोत्तम पोझरलाही आकर्षक आणि सरप्राइज गिफ्ट दिलं जाणार असल्याचे आडविलकर यांनी सांगितले.

ऋषभ चोक्सींचा अव्वल तिघांना पुरस्कार

मनीष आडविलकर्स “परळ श्री’चे वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेत जो खेळाडू उतरणार त्या प्रत्येक खेळाडूला बक्षीस दिलं जाणार आहे. एकही खेळाडू रिकाम्या हाताने परतणार नाही याची काळजी आम्ही घेतली आहे. अन्सार मोहम्मद यांनी दिव्यांग शरीरसौष्ठवपटूंच्या सर्व रोख पुरस्काराची जबाबदारी घेतली असून भारत श्री आशिष साखरकरकडून दिव्यांग विजेत्याला आकर्षक चषक दिला जाणार आहे. या स्पर्धेतील प्रत्येक खेळाडूच्या शरीरावर आंतरराष्ट्रीय दर्जाची टॅनिंग क्रीम अगदी मोफत लावली जाणार आहे. शरीरसौष्ठवावर प्रेम करणाऱ्या स्पार्टन न्यूट्रिशनचे सर्वेसर्वा ऋषभ चोक्सी यांनी मनीष आडविलकर्स “परळ श्री’च्या अव्वल तीन खेळाडूंना वर्षभराचे न्यूट्रिशन आणि सप्लिमेंट्स देणार असल्याची घोषणा केली आहे. एवढेच नव्हे तर प्रोबस्ट, मसल गिअरसारख्या न्यूट्रिशन्सही खेळाडूंना सप्लिमेंट्सचा पुरस्कार देणार आहेत. त्यामुळे या स्पर्धेसाठी मुंबई शहरातील शरीरसौष्ठवपटू मोठ्या संख्येने सहभागी होतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
 
मुंबई शहरातील सर्व खेळाडूना खेळण्याचे आवाहन

मनीष आडविलकर्स “परळ श्री’ स्पर्धा बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव व फिटनेस संघटनेच्या मान्यतेने होत असली तरी या स्पर्धेत मुंबई शहराच्या हद्दीत रहाणाऱ्या सर्व खेळाडूंना स्पर्धेत उतरण्याच आवाहन करण्यात आले आहे. मग तो खेळाडू उंचीच्या संघटनेचा असो किंवा अन्य कोणत्याही संघटनेचा. सर्व संघटनांचे खेळाडू परळ श्रीच्या निमित्ताने एकाच मंचावर उतरावेत, हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. मला माझ्या संघटनेने पूर्ण सहकार्य केले आहे आणि अन्य संघटनेच्या खेळाडूंनी या स्पर्धेत पूर्ण तयारीनिशी उतरून शरीरसौष्ठवातलं आपलं ऐक्य दाखवून द्यावे, असे आवाहन आयोजक आडविलकर यांनी केले आहे.
 

 551 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.