शेतकऱ्यांची फसवणूक, महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपा रस्त्यावर उतरणार

शहराध्यक्ष निरंजन डावखरे यांची माहिती

ठाणे : जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेल्या शिवसेना–काँग्रेस–राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून, आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे मंगळवार २५ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष व आमदार निरंजन वसंत डावखरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आमदार निरंजन डावखरे म्हणाले, भाजपाचा विश्वासघात करुन काँग्रेस–राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. सरकार स्थापन करीत असतांना शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी आणि आताच्या मुख्यमंत्र्यांनी तसेच काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अवकाळीग्रस्तांना प्रती हेक्टर २५ हजार रुपये आणि फळबागांसाठी प्रती हेक्टर ५० हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली होती. पण महाविकास आघाडी सरकारच्या प्रमुखांना आपल्या आश्वासनाचा विसर पडला आहे. सरसकट कर्जमाफी करू, सातबारा कोरा करू अशा घोषणा करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यापैकी एकही आश्वासन पाळलेले नाही. महाआघाडी सरकारची कर्जमाफी योजनाही शेतकऱ्यांची सरसकट फसवणूक करणारी आहे. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फक्त अल्प मुदतीची पीक कर्जे माफ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही. दोन लाखांवर कर्ज असलेल्या तसेच कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांबाबत महाविकास आघाडीच्या कर्जमाफी योजनेत कसलाच उल्लेख नाही.'' भाजपा सरकारच्या कर्जमाफीत पीक कर्ज तसेच मध्यम मुदतीचे कर्ज समाविष्ट केल्याने पॉलिहाऊस, शेडनेट, शेती उपकरणे, पशुपालन, शेळीपालन, मधमाशीपालन अशा सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता. भाजपा सरकारच्या व्यापक कर्जमाफीमुळे ४३ लाख खातेधारकांना १९ हजार कोटींचा लाभ देण्यात आला होता. तूर खरेदीचे निकष महाविकास आघाडी सरकारने बदलल्यामुळे शेतकऱ्यांकडून होणाऱ्या खरेदीचे प्रमाण खूप कमी झाले आहे. शेतकऱ्यांची घोर फसवणूक करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा भारतीय जनता पार्टी तीव्र निषेध करीत आहे, असे आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला भाजपाचे महापालिकेतील गटनेते संजय वाघुले, नगरसेवक अॅड. संदीप लेले, मिलिंद पाटणकर, मनोहर डुंबरे, कृष्णा पाटील, सुनेश जोशी, मनोहर सुगदरे, महिला आघाडीच्या हर्षला बुबेरा आदी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले,गेल्या महिनाभरात राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना धाक बसविण्याऐवजी महाआघाडी सरकारचे मंत्री गावोगावी सत्कार घेण्यात मश्गूल आहेत. हे सरकार सत्तेवर आल्यानंतर गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही. हिंगणघाट येथील प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरला. अॅसिडहल्ला, अल्पवयीन मुलींवर अत्याचार, बलात्कार, महिलांना जाळून टाकणे अशा घटना वाढू लागल्यामुळे महिला व तरुण मुलींमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारचा भाजपा तीव्र निषेध करीत आहे.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी होणाऱ्या धरणे आंदोलनात आमदार संजय केळकर, ज्येष्ठ नगरसेवक संदीप लेले, भाजपाच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा माधवी नाईक, महापालिकेतील गटनेते संजय वाघुले यांच्यासह पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

स्थगिती' सरकार प्रमुखांनी केलेल्या भूमिपूजनालाच स्थगिती : डावखरे

राज्यातीलस्थगिती’ सरकारचे प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्बन फॉरेस्ट व विज्ञान केंद्राचे भूमिपूजन केले होते. या भूमिपूजनालाच महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने स्थगिती दिली, अशी टीका शहराध्यक्ष निरंजन डावखरे यांनी केली. यापुढे पक्षप्रमुखांना बोलाविण्याआधी शिवसेनेच्या नेत्यांनी आपली भूमिका निश्चित करायला हवी. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भूमिपूजनाचा फलक शिवसेना काढून टाकणार का, असा सवालही आमदार डावखरे यांनी केला.
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी झोपडीवासियांना ५०० चौरस फूटांचे घर देण्याची घोषणा केली होती. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने ५०० चौरस फूटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करात माफीची घोषणा केली होती, या घोषणांचे काय झाले, असा सवाल निरंजन डावखरे यांनी केला.

अन्यायी सरकार
क्लस्टरमधून गावठाणे व कोळीवाड्यांना वगळण्याची तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती. मात्र, हाजुरी गावठाणाचा प्रकल्पात समावेश करण्यात आला. महाआघाडी सरकारकडून अन्याय केला जात असल्याकडे आमदार डावखरे यांनी लक्ष वेधले. कळवा-ऐरोली रेल्वेमार्गाच्या कामात विस्थापित होणाऱ्या कुटुंबांचे गायमुख येथे पुनर्वसन केले जाणार आहे. या कुटुंबांची नोकरी व मुलांचे शिक्षण कळवा-ऐरोली परिसरात सुरू आहे. त्यामुळे त्यांचे पुनर्वसन कळवा परिसरातच करावे. दिवा परिसरातील डंपिंग ग्राऊंडवर कचरा जाळला जात असून, दुर्गंधीचा त्रास होत आहे. तर दिव्याच्या हक्काचे पाणी बिल्डरकडे वळविले जात आहे, या प्रकाराला भाजपाचा तीव्र विरोध आहे, असे निरंजन डावखरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

 537 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.