सुप्रिमो चषकात शौर्य हर्षितने गाजवले शौर्य

गतविजेत्या उमर इलेव्हनकडून निराशा , विश्वनाथ जाधव ठरला एक्स्प्रेसो कारचा मानकरी

मुंबई : एकीकडे आयपीएलचा संघर्ष सुरू असताना टेनिस आयपीएल सुप्रिमो चषकाचा थरार अनुभवण्यासाठी मध्यरात्री अडीच वाजताही तब्बल १५ हजार क्रिकेट वेड्यांची गर्दी आणि त्याच अभूतपूर्व गर्दीत ठाण्याच्या शौर्य हर्षित संघाने पदार्पणातच सुप्रिमो चषक जिंकण्याचे शौर्य दाखवले. पुण्याच्या शिरसाट स्पोर्ट्सचा ३९ धावांनी धुव्वा उडवत सुप्रिमो चषकाचे दहावे मोसम आपल्या नावावर नोंदविले
सुप्रिमो चषकाची क्रेझ किती वाढलीय हे आज समस्त सांताक्रुझकरांना अनुभवलं. गतविजेता उमर इलेव्हन उपांत्य फेरीचा सामना खेळायला उतरण्यापूर्वी त्यांचा खेळ पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांचा उसळलेला सागर पाहून आयोजक आणि पोलिसांना एअर इंडिया स्पोर्ट्स स्टेडियमचे दरवाजे बंद करावे लागले. क्रिकेटप्रेमींच्या गर्दीने स्टेडियम खचाखच भरले असताना गेटवरही तश्शीच गर्दी उसळली होती. जागोजागी वाहतूककोंडी झाली होती. आवडत्या संघाचा खेळ पाहायला मिळत नसल्यामुळे क्रिकेटप्रेमी चिडले होते. त्यांची समजूत काढणे कठीण होत होते. अशा सुप्रीम गर्दीत सुरू झालेल्या उपांत्य सामन्यात उमर इलेव्हनने घोर निराशा केली. शिरसाट स्पोर्ट्सने उमरचे ६७ धावांचे आव्हान २ चेंडू आणि ७ विकेट राखत पार पाडले आणि अंतिम फेरीत धडक मारली. उमरच्या पराभवामुळे स्टेडियमबाहेर असलेली गर्दी काहीशी ओसरली. पण स्टेडियममध्ये असलेल्या प्रेक्षकांनी आपली जागा सोडली नाही.
अंतिम सामना उमर इलेव्हनशिवाय पाहणे, थोडेसे पचनी पडत नव्हते. स्पर्धेत प्रथमच खेळत असलेल्या शौर्य हर्षित संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेत शिरसाट स्पोर्ट्स च्या गोलंदाजीला फोडून काढले. सुमित ढेकळेने १३ चेंडूत २५ धावा चोपून काढल्या. तसेच विश्वनाथ जाधव (११), अख्तर शेख (१२), राहुल जोगडिया (१०) यांनी छोट्या पण फटकेबाज खेळ्या केल्या. त्यामुळेच ते ८ षटकात ८१ अशी दमदार आव्हान उभारू शकले. शिरसाटच्या किरण खोबरेने १९ धावा देत ४ विकेट घेतल्या पण त्याचा शौर्य हर्षित संघाच्या धावांवर काहीही फरक पडला नाही. मात्र ८२ धावांचा पाठलाग करताना शिरसाट संघाला शौर्य हर्षित संघाच्या गोलंदाजांसमोर उभेच राहता आले नाही. विवेक शेलार, इम्ब्रोज खान आणि विश्वनाथ जाधव यांनी अचूक मारा करीत शिरसाटच्या फलंदाजांना दोन अंकी आकडाही गाठू दिला नाही. धोनी लेफ्टी आणि रवी अहिरेला लवकर गुंडाळून शौर्य हर्षितने आपला मोठा विजय निश्चित केला. शेलारने आणि इम्ब्रोजने १० धावांत २ विकेट घेतले तर विश्वनाथ जाधवने १धावेत २ विकेट घेत शिरसाट स्पोर्ट्सची ८ बाद ४२ अशी अवस्था करीत आपल्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
डिंग डाँगचे वॉरियर्स अपयशी
पहिल्या उपांत्य लढतीत डिंग डाँग नियाझी वॉरियर्स च्या राजेश सोरटेने सामन्याच्या पहिल्याच दोन चेंडूंवर आकाश जांगिड आणि अंकित मौर्य यांना बाद करून सनसनाटी निर्माण केली होती. पण सुमित ढेकळेने १६ चेंडूत २१ आणि विश्वनाथ जाधवने २० चेंडूत ३१ धावा ठोकून संघाला ३ बाद ६६ अशी मजल मारून दिली. शौर्य हर्षितच्या आव्हानाला डिंग डाँग नियाझी वॉरियर्स उत्तरच देऊ शकले नाही. विवेक शेलार आणि इम्ब्रोज खानने उत्कृष्ट मारा करीत त्यांचा फलंदाजांना बांधून ठेवले. डिंग डाँगचे एजाज कुरेशी आणि कृष्णा सातपुते अपयशी ठरल्यामुळे त्यांचा संघ ४५ धावापर्यंतच पोहोचू शकला आणि शौर्य हर्षितने २१ धावांनी विजय मिळविला.
उमरकडून अपेक्षाभंग
दुसऱ्या उपांत्य लढतीत उमर इलेव्हनकडून सर्वांना अपेक्षा होती, पण त्यांनी अपेक्षाभंग केला. त्यांच्या डावात फरदीन काझीने १५ चेंडूत ३० धावा काढल्या, पण मुन्ना शेख आणि उस्मान पटेल यांनी निराशा केली. अन्यथा उमरचे आव्हान आणखी मोठे होऊ शकले असते. डींग डाँग कडून किरण खोबरे आणि जॉन्सनने प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या. उमरच्या ६७ धावांचा पाठलाग करताना शिरसाट संघाने आपले फलंदाज गमावले नाही. त्यातच उमरच्या गोलंदाजांना त्यांचा फलंदाजांवर नियंत्रण मिळविता आले नाही. तरीही सामना शेवटच्या षटकापर्यंत समान रेषेत होता. ६ चेंडूत ११ धावांची गरज असताना राजू मुखियाने चेंडू हातात घेतला, पण संस्कारने दुसऱ्या चेंडूवर स्ट्राइक मिळताच २.२ आणि षटकार खेचून उमर इलेव्हनचे आव्हान संपुष्टात आणले. संस्कारने १३ चेंडूत २४ तर धोनी लेफ्टीने १८ चेंडूत १९ धावा ठोकत शिरसाट स्पोर्ट्स ला २ चेंडू राखून विजय मिळवून दिला. संस्कारची खेळी विजयाची शिल्पकार ठरली
विश्वनाथ जाधवला एक्स्प्रेसो कार

आपल्या नावाप्रमाणे सुप्रीम असलेल्या या स्पर्धेत विजेत्या शौर्य हर्षित संघाला १९८३ च्या प्रुडेंशियल कपची प्रतिकृती आणि ११ लाख रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले. या सुप्रिमो स्पर्धेचा पुरस्कार सोहळा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते सुभाष देसाई, सचिव मिलिंद नार्वेकर, हॉकी स्टार धनराज पिल्ले आणि आयोजक आमदार विभागप्रमुख संजय पोतनीस, आमदार विभागप्रमुख ऍड. अनिल परब यांच्या उपस्थितीत पार पडला. फलंदाजीत ६८ धावा आणि ५ विकेट टिपत अष्टपैलू कामगिरी करणारा शौर्य हर्षित संघाचा विश्वनाथ जाधव मालिकावीर ठरला. त्याला मारुती सुझुकीची एक्स्प्रेसो कार देण्यात आली. तसेच एजाज कुरेशी (फलंदाज), इम्ब्रोज खान (गोलंदाज) आणि रवी अहिरे ( क्षेत्ररक्षक) यांना वैयक्तिक पुरस्कार म्हणून यामाहा फसिनो ही दुचाकी देण्यात आली.

 124 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.