खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे विचारे प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद – पांडुरंग चाटे

खेळाडूंना साईतर्फे लागेल ती मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन चाटे यांनी यावेळी दिले.

मुंबई : खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे कै. मनोहर विचारे प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन भारतीय खेल प्राधिकरणाचे प्रादेशिक निर्देशक, (आय. आर. एस.) पांडुरंग चाटे यांनी केले. सीएसटी येथील मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात झालेल्या कै. मनोहर विचारे प्रतिष्ठानच्या मराठी गौरव, क्रीडा पुरस्कार वितरण समारंभात पांडुरंग चाटे यांनी आपले वरील मनोगत व्यक्त केले. खेळाचा फायदा तुम्हाला चांगला अभ्यास करण्यासाठी उपयोगी पडू शकतो, अभ्यासासाठी तुमची चांगली एकाग्रता होऊ शकते. त्यामुळे खेळाडूंनी खेळा बरोबरच अभ्यासावर देखील तितकाच भर द्यायला हवा. खेळ म्हणजे एक प्रकारचा अभ्यासच असल्याचे चाटे म्हणाले. खेळ तुम्हाला पूर्ण जीवन विकसीत करायला मदत करते, खेळाडू कधीच हार मानत नाही. आपल्या खेळात अधिकाधीक सुधारणा करण्यासाठी तो नव्या नव्या गोष्टींवर भर देत असतो. गेल्या ५-६ वर्षात भारताने आंतरराष्ट्रीय क्रीडा विश्वात मोठी झेप घेतली आहे. त्यामध्ये भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे देखील मोठे योगदान आहे. फिट इंडिया मुव्हमेंटला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे देखील चाटे यांनी सांगितले. भारतात क्रीडा संस्कृती आता चांगली रुजतेय. ती अधिक रुजण्यासाठी तळागाळातील युवा खेळाडूंकडे लक्ष देणे आवश्यक आहे. खरे ‘टॅलेंट’ कुठे आहे याचा देखील शोध घ्यायला हवा. आगामी पॅरीस ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत भारत आपली सर्वोत्तम कामगिरी करेल असा विश्वास चाटे यांनी व्यक्त केला. खेळाडूंना साईतर्फे लागेल ती मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन चाटे यांनी यावेळी दिले.
यावेळी द्रोणाचार्य पुरस्कार विजेते, आंतरराष्ट्रीय बुजुर्ग बुद्धिबळपटू, प्रशिक्षक रघुनंदन गोखले आणि भारतीय खो-खो पुरुष संघाचे प्रशिक्षक डॉ. नरेंद्र कुंदर यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या पहिल्या भारत श्री किताब विजेत्या विजू पेणकर यांनी देखील प्रतिष्ठानच्या कार्याचा गौरव केला. गेली २४ वर्षे हे पुरस्कार दिले जात आहेत ही गोष्ट कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले. तसेच गरजू खेळाडूंना आपण नक्कीच मदतीचा हात पुढे करू असे ठोसपणे त्यांनी सांगितले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय विचारे, विश्वस्त संदिप चव्हाण यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. पुरस्कार विजेत्यांतर्फे श्री मावळी मंडळाचे विश्वस्त प्रभाकर सुर्वे, ज्येष्ठ छायाचित्रकार मोहन बने, शशिकांत कोरगावकर, मनोहर साळवी, मिलिंद पूर्णपात्रे, सागर कातुर्डे, दिपक शिंदे, मार्क धर्माई, वर्षा नागरे, वृषाली देवधर, मनाली साळवी, श्वेता खिळे यांनी सत्काराला उत्तर दिले. ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुहास जोशी यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. स्मिता साळवी, किशोर जठार, देवीदास पवार, स्मिता बने, विजय विचारे यांचे सहकार्य या कार्यक्रमासाठी मिळाले. स्व. बाळकृष्ण साळवी, स्व. शालिनी साळवी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा मराठी गौरव पुरस्कार सोहळा आयोजित केला होता.

 52 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.