ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाने कळ्याफिती लावून जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
ठाणे : राजापूर तालुक्यातील महानगर टाईम्सचे पत्रकार शशिकांत वारीसे यांचा अपघातात मृत्यु झाला. तर हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हेगारांना त्वरित अटक करण्यात यावी. आणि या प्रकरणाची फास्टट्रॅक (जलदगती न्यायालयामार्फत) कोर्टामार्फत सुनावणी व्हावी या मागणीसाठी शुक्रवारी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने आंदोलनं करण्यात आले. तर यावेळी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते.
सभ्य आणि सुसंस्कृत महाराष्ट्रात भूमिका घेऊन पत्रकारिता करणारया पत्रकारांचा आवाज कायमचा बंद केला जातो, पत्रकारांवर हल्ले करून किंवा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय , पत्रकार संरक्षण कायदा आहे मात्र या कलमाखाली गुन्हे दाखल करायलाही टाळाटाळ केली जाते त्यामुळे महाराष्ट्रात निर्धोकपणे काम करणे पत्रकारांना कठीण झाले आहे. या घटना सातत्यानं वाढत असल्याने पत्रकारांमध्ये भिंतीची भावना निर्माण होत आहे.
महानगर टाईम्सचे राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या बाबतीत असेच घडले असल्याची भावना यावेळी पत्रकारांनी व्यक्त केली.
सोमवारी कोदवली येथून आपल्या दुचाकीने शशिकांत वारीसे जात होते. यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या महेंद्रा थार गाडीने त्यांच्या गाडीला धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, शशिकांत वारीसे गंभीर जखमी होवून त्यांचा मृत्यू झाला. मात्र हा अपघात नसून घातपात आहे. शशिकांतने ज्याच्या विरोधात बातमी प्रसिध्द केली ते कारचालक पंढरीनाथ आंबेरकर होते. सकाळी पंढरीनाथ आंबेरकर याच्या विरोधात बातमी लागते आणि त्याच व्यक्तीची कार वारीसे यांच्या गाडीला जोरदार धडक देते, त्यात वारिशे यांचा दुर्दैवी मृत्यू होतो हा केवळ योगायोग नसून कट रचून केलेला हा खून असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा आम्ही राज्यातील सर्व पत्रकार तीव्र शब्दात निषेध करीत आहोत.. तसेच आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, या घटल्याची सुनावणी फास्टट्रॅक (जलदगती न्यायालयामार्फत) कोर्टामार्फत व्हावी आणि राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी ठाण्यात आंदोलन करण्यात आले.
6,756 total views, 2 views today