युनियन बँक, आयएसपीएल बाद फेरीत

स्वामी समर्थ क्रीडा मंडळ आयोजित राजाभाऊ देसाई स्मृतीचषक विशेष व्यावसायिक कबड्डी स्पर्धा

मुंबई : सुयोग गायकर आणि कार्तिक राव यांच्या सुसाट खेळाच्या जोरावर युनियन बँकेने पिछाडीनंतरही आघाडी घेण्याची किमया दाखवत मुंबई महानगरपालिकेचा ३४-३० असा निसटता पराभव करीत स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या विशेष व्यावसायिक कबड्डी स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला. तसेच आयएसपीएल, भारत पेट्रोलियम, मध्य रेल्वे या बलाढ्य संघांसह मिडलाईन या संघानेही बाद फेरीत आपले स्थान निश्चित के़ल
प्रभादेवीच्या चवन्नी गल्लीत भव्य स्टेडियममध्य उभारलेल्या दिलीप परब क्रीडानगरीत आज कबड्डीप्रेमींना जोरदार खेळ प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला. मुंबई महानगरपालिकेच्या राहुल धनावडे आणि संदीप नवगरेच्या खेळामुळे मध्यंतराला १६-१० अशी भक्कम आघाडी घेतली होती. पण मध्यंतरानंतर प्रतिक बैलमारे आणि सुयोग गायकरने आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर सामन्याचा निकालच फिरवला. सुयोगने भन्नाट चढाया करीत १० गुण मिळविले तर प्रतिकने अफलातून पकडी करीत प्रतिस्पर्धी मुंबई महापालिकेच्या चढाईबहाद्दरांना ८ वेळा आपल्या जाळ्यात अडकवत ६ धावांची पिछाडी भरुन संघाला आघाडीवर नेले. प्रतिकने एकूण १२ गुणांची कमाई करत युनियन बँकेला गटात अव्वल स्थान पटकावून दिले.
रायगडच्या मिडलाईनने न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्सचे आव्हान २९-२५ असे मोडीत काढले. मिडलाइनने प्रफुल झवरे चढायांमुळे न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्सवर १८-१५ अशा छोटीशी का होईना आघाडी मिळविण्यात यश मिळविले होते. ही आघाडी धीरज बैलमारेच्या अप्रतिम पकडींनी आणखी वाढवण्याचा प्रयत्न केला. न्यू इंडियाच्या सिद्धेश तटकरेने पकडीत ९ गुण मिळवित सामन्यात चुरस निर्माण केली, पण शेवटी मिडलाइनने २९-२५ च्या फरकाने सामना जिंकला आणि आपला बाद फेरीतील प्रवेश निश्चित केला.
दुसर्‍या एका सामन्यात बलाढ्य मध्य रेल्वेच्या तगड्या खेळाडूंनी बँक ऑफ बडोदाचे आव्हान ४६-२८ असे सहजगत्या परतावून लावले. डावाच्या प्रारंभापासूनच पंकज मोहिेते राजधानी इतकी सुसाट होती की त्यांनी बडोद्याच्या गुणांवर दरोडा टाकला. पंकजचा खेळ इतका सुसाट होता की मध्यंतरालाच त्यांच्याकडे २८-१२ अशी प्रचंड आघाडी होती. मध्यंतरानंतर थोडा वेग कमी झाला, पण पंकजने १८ गुणांची कमाई करत बँक ऑफ बडोदाचे आव्हान साखळीतच संपवले.विनोद अत्याळकर, बलिंदर सिंग यांनी अप्रतिम पकडी करीत आपल्या खात्यात ७ आणि ८ गुणांची कमाई केली बँक ऑफ बडोदाकडून प्रणय राणेने २१ चढायांमध्ये १० गुणांची कमाई केली, पण ते गुण संघाला विजय मिळवून देण्यास पुरेसे ठरले. अन्य झालेल्या सामन्यात मुंबई पालिकेच्या खेळाडूंनी त्रिमूर्ती इंटरप्राइजेसचा ३९-२८ असा सहज पराभव केला.

 123 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.