भावी पिढीने वाढवली तरच, गायन कला वाढेल

प्रख्यात गायक महेश काळे यांच्या बहारदार मुलाखतीने झाला सुयश व्याख्यानमालेचा समारोप.

ठाणे : नैसर्गिक पद्धतीने गाणे ऐकण्याची पर्वणी सध्या सुरु असलेल्या गायन स्पर्धेतील गावोगावच्या मुलांकडुन मिळते.तेव्हा, या भावी पिढीने वाढवली तरच, गायन कला वाढेल ! अशी अपेक्षा प्रख्यात गायक महेश काळे यांनी व्यक्त केली आहे.
ठाणे पूर्वेतील सुयश कला-क्रीडा मंडळ, सिध्दीविनायक मंदिराच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेचे तिसरे पर्व रविवारी पार पडले. यावेळी “कट्यार काळजात घुसली ‘ फेम राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध गायक महेश काळे यांची मुलाखत अभिनेत्री,लेखिका, दिग्दर्शिका संपदा जोगळेकर – कुलकर्णी यांनी घेतली. महेश काळे यांच्या सुरेल आवाजातील मुलाखतीने श्रोते मंत्रमुग्ध झाले. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी मंडळाचे जयदीप कामत, मुधसूदन राव, गजानन पालवे, सतीष सावंत, सुरेश तिवटणे,गिरीश राजे, हेमंत पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
जुन्या आठवणींचा जागर करीत महेश काळे यांनी आपल्या कारकिर्दीचा जीवनपट उलगडत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
कलाकार म्हटला की, तो फुलावा असं माझं नेहमी ध्येय असते. मी बनारसवरून आलो असुन अमेरिकेत शिकलो. गायक असलो तरी मल्टीमीडिया आणि इलेक्ट्रॉनिक इंजीनियरिंग अशा दोन पदव्या मिळवल्याचे काळे यांनी सांगितले.आई- वडीलाकडून गाणे शिकलो. तीन वर्षाचा होतो, तेव्हा गोंधळेकर महाराज यांच्याकडे काकड आरती शिकुन गायला लागलो.”जर गळ्यातील गाणं तुम्हाला काही देऊ शकलं नाही तर, भिंतीवरील सर्टिफिकेट काय देईल. असे स्पष्ट करीत मी आनंदासाठी गातो, असे सांगितले. शाळेत मी खूप मस्तीखोर होतो,तेव्हा एक मॅडम मला नेहमी म्हणायचे महेश, स्टँड अप अँड गेट आऊट ऑफ माय क्लास. अशी आठवणही त्यांनी जागवली. “आयुष्यातील पहिलं चित्रीकरण “विश्वकर्मा” यातून झाले असुन “कट्यार काळजात घुसली” या गाण्याला नॅशनल अवॉर्ड मिळाले. पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा शिष्य असताना मला हिंदुस्तानी संगीताचा प्रसार कसा करावा हे कळल्याचे सांगताना आपल्या सुरेल सुरांनी काही गाण्यांची कडवी गाऊन काळे यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.ध्यास नवा सुर नवा स्पर्धेसाठी मुलं येतात त्यांच्याबद्दल काय वाटते? यावर उत्स्फूर्तपणे बोलताना महेश यांनी, कुठल्या कुठल्या गावातुन ही मुलं येतात. त्यांच्यामुळेच नैसर्गिक पद्धतीने गाणे ऐकण्याची संधी लाभते.अशा या भावी पिढीने वाढवली तरच ही गायन कला वाढेल. काय केले पाहीजे काय करू नये हे भावी पिढीला कळले पाहीजे.असा मौलिक सल्लाही त्यांनी दिला.
मुलाखतीमध्ये आम्हाला गोड गोड बोलावे लागते – मुख्यमंत्री
सुयश व्याख्यानमालेच्या या उपक्रमाचे कौतुक करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, सध्या आम्हालाही खुप मुलाखती द्याव्या लागत असल्याचे सांगितले. आम्हाला गोड गोड बोलल्याशिवाय चालत नाही. कोपरी हा माझा मतदार संघ आहे आणि कोपरीतील लोकांनी निवडून दिल्यामुळे मी मुख्यमंत्री झालो. धकाधकीच्या जीवनामध्ये थोडावेळ का होईना इकडे सगळे लोक शांतपणे ऐकताहेत. ही फार मोठी गोष्ट असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

 378 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.