‘त्या’ निराधार बहिणींना मायेचा आधार

– मेट्रो दुर्घटनेतील मृत महिलेच्या मुलींची उचलली शैक्षणिक जबाबदारी.
– ठाण्यातील समता युथ फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम.     

ठाणे  : मेट्रोच्या कामाकरिता खोदलेल्या खड्ड्यामध्ये पिलरच्या सपोर्टसाठी लावलेली लोखंडी प्लेट कोसळून दहा दिवसांपूर्वी सुनिता कांबळे यांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना ठाण्यातील विवियाना मॉल समोरील महामार्गावर घडली. पती बाबासाहेब कांबळे यांच्या निधनानंतर दोन्ही मुलींचा सांभाळ करण्यासाठी कचरा वेचणाऱ्या सुनिता यांचाही मृत्यू झाल्याने त्यांच्या स्नेहा व प्रमिला या दोन्ही मुलींच्या डोक्यावरील मायेचे छ्प्परच हरपले. एका क्षणात होत्याचे नव्हते झालेल्या निराधार बहिणींच्या मदतीसाठी कोणीच पुढे आलेले नसताना ठाण्यातील समता युथ फाऊंडेशनने या दोन्ही बहिणींच्या शिक्षणाचा सर्वतोपरी खर्च उचलला आहे. या निर्णयाचे पत्रच संस्थेच्या वतीने या बहिणींना नातेवाईकांच्या उपस्थितीत सुपूर्त करण्यात आले. त्यामुळे कोवळ्या वयात निराधार झालेल्या या बहिणींना मायेचा आधार मिळाला आहे.
वडाळा – कासारवडवली या मेट्रो टप्प्याच्या कामाकरिता खोदण्यात आलेल्या खड्ड्यामध्ये पिलरच्या सपोर्टसाठी लावण्यात आलेली लोखंडी प्लेट पडल्याने लोकमान्य नगर येथे राहणाऱ्या कचरावेचक सुनीता कांबळे यांचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूनंतर त्यांनी काबाडकष्ट करून सुनीता यांनी मुलींचा सांभाळ केला होता. मात्र या घटनेनंतर त्यांच्या स्नेहा व प्रमिला या
अनुक्रमे दहावी व अकरावीत शिकणाऱ्या मुलींसमोर आता जगायचे कसे, असा यक्षप्रश्न उभा राहिला. कोणताच मदतीचा हात पुढे येत नसतानाच या घटनेचे गांभीर्य ओळखून समता युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष आदित्य धुमाळ यांनी कांबळे बहिणींच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची तयारी दर्शवली. फाउंडेशनचे सल्लागार राजन धुमाळ यांनी स्नेहा व प्रमिला या बहिणींची घरी जाऊन भेट घेत आस्थेने चौकशी केली. त्यानंतर या दोन्हीही बहिणींना त्यांच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत मदतीचे पत्र अध्यक्ष आदित्य धुमाळ यांनी सुपूर्त केले.
आम्ही सदैव तुमच्यासोबत
भविष्यात या दोघींच्या शिक्षणाची फी व शैक्षणिक साहित्याबाबत सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, तसेच इतर कोणतीही मदत लागल्यास हक्काने सांगा, आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत, असे वचन धुमाळ यांनी याप्रसंगी कांबळे बहिणींना दिले. यासोबतच समाजातील इतर दानशूर व्यक्ती, संस्थेला या बहिणींना मदत करायची असल्यास त्यांनी ९१६७२३६९६७ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले आहे. या निर्णयाबद्दल कांबळे कुटुंबीयांनी समता युथ फाऊंडेशनचे आभार मानले.

 163 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.