रुग्णांचा ५४ लाख ९९ हजार रुपयांचा परतावा अजूनही शिल्लक , चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर
कारवाई करण्याची मनसेचे संदीप पाचंगे यांची मागणी
ठाणे : कोरोना उपचारानंतर अवाजवी बिले देत रुग्णांचे खिसे कापणार्या खासगी रुग्णालयांना लगाम घालण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांच्या पाठपुराव्यानंतर
ठाणे महापालिका प्रशासनाने कोरोना रुग्णांचे बिल योग्य पध्दतीने तपासण्यासाठी लेखापरिक्षकांची नेमणूक केली होती. यामध्ये १ कोटी ८९ लाख ८२ हजार रुपयांचा आक्षेपार्ह बिलांचा झोल उघडकीस आला. माञ दोन वर्षे उलटून गेल्यानंतरही १ कोटी ३४ लाख ८३ हजार रूपयांचा रुग्णांना परतावा केला असला तरी अजूनही ५४ लाख ९९ हजार रुपयांचा परतावा शिल्लक आहे. त्यातही तीन मुजोर रुग्णालयांकडे १० लाखापेक्षा जास्त रक्कम शिल्लक असल्याने त्यांच्यावर कारवाई करून वसुली करण्याचे पत्र लेखा परीक्षण विभागाने आरोग्य विभागाला दिले आहे मात्र दोन महिने झाले तरी टाळाटाळ सुरु असल्याचे संदीप पाचंगे यांनी सांगितले.
कोरोना लढ्यात एकीकडे राज्य शासनाने सुरवातीला ‘तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो’ अशी आणि नंतर ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अशी भावनिक साद नागरिकांना घातली होती. मात्र दुसरीकडे ठाण्यात या उक्तीच्या विरोधात खासगी रुग्णालयांनी रुग्णांची लूट सुरु केली होती. कोरोनाच्या उपचारादरम्यान रुग्णालय प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात मनसेचे पाचंगे यांनी आवाज उठवला होता. रुग्णालय प्रशासनाचा बिलांबाबतचा गलथानपणा रोखा, अशी मागणी पालिका आयुक्तांची भेट घेत त्यांनी केली होती. त्यानुसार तात्काळ पालिका प्रशासनाने कोविड रुग्णालयांकडून रुग्णांना दिल्या जाणार्या बिलांचे लेखापरिक्षण करण्यासाठी ८ कनिष्ठ लेखापरिक्षकांची नेमणूक केली होती. आरोग्य विभागाने रुग्णांच्या बिलांबाबत ठरवून दिलेल्या निकषांनुसार बिल रुग्णालय प्रशासनाने दिले का, यावर या टीमने परिक्षण करुन १ कोटी ८९ लाख ८२ हजार १२८ रुपयांची बिलांची रक्कम आक्षेपार्ह ठरवली होती. मात्र तेव्हा ही वाढीव बिले कमी करण्यास रुग्णालयांनी नकार दिला होता. तर काही रुग्णालयांनी कोर्टात जाण्याचा इशारा दिला होता. तेव्हा संदीप पाचंगे यांनी वाढीव बिलाचा परतावा रुग्णांना होत नाही तोपर्यंत रुग्णालयांचे नूतनीकरण करू नका असा सल्ला दिला होता. परिणामी अनेक रुग्णालयांनी वाढीव बिलांचा परतावा केला. मात्र काही मुजोर रुग्णालयांचे प्रशासन वाढीव बिलांचा परतावा करण्यास तयार नाहीत. गांधीनगर येथील वेल्लम रुग्णालयाने ५ लाख ५० हजार ६५० रुपयांचा धनादेश रुग्णाचा परतावा म्हणून आरोग्य विभागाकडे दिला आहे. अद्याप ही रक्कम रुग्णांना परत केली गेली नाही. आरोग्य विभागाकडून कारवाईस टाळाटाळ केली जात आहे .जादा बिलाच्या आकारणी संदर्भात पालिकेचे मुख्य लेखा परीक्षक संजय पतंगे यांनी ३० नोव्हेंबर २०२२ रोजी पालिकेच्या आरोग्य विभागाला पत्र लिहिले असून त्यात हायलँड हॉस्पिटल ११ लाख ५४ हजार ८२०, युनिव्हर्सल हॉस्पिटल १० लाख १० हजार ५४६ आणि निऑन हॉस्पिटल १५ लाख ५० हजार ८४८ हजार रुपयांचा परतावा शिल्लक असून या रुग्णालयांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने आपल्या स्तरावर कारवाई करून वसुली करण्यात यावी अशी सूचना केली आहे. मात्र आरोग्य विभागाकडून अद्याप कारवाई करण्यात आली नसल्याचे उघडकीस आले आले आहे.
297 total views, 3 views today