पांचगणीत राज्यस्तरीय पुरुष व्यावसायिक आणि स्थानिक महिला गटाच्या कबड्डी स्पर्धेचा थरार

महाबळेश्वर, पांचगणी, भिलार, वाई यांसारख्या आसपासच्या गावांसाठी पर्वणी ठरणाऱ्या या स्पर्धेच्या निमित्ताने चाहत्यांना अव्वल कबड्डीपटूंचा खेळ पाहण्याची संधी मिळणार आहे.

पांचगणी : पांचगणीमधील ‘टेबल लँड’च्या पायथ्याशी वसलेल्या ऐतिहासिक पांचगणी व्यायाम मंडळाच्या क्रीडांगणावर गुरुवारी, १२ जानेवारीपासून राज्यस्तरीय पुरुष व्यावसायिक आणि स्थानिक महिला गटांच्या कबड्डी स्पर्धेला प्रारंभ होत आहे. महाबळेश्वर, पांचगणी, भिलार, वाई यांसारख्या आसपासच्या गावांसाठी पर्वणी ठरणाऱ्या या स्पर्धेच्या निमित्ताने चाहत्यांना अव्वल कबड्डीपटूंचा खेळ पाहण्याची संधी मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने होणाऱ्या या निमंत्रितांच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुष विभागात १२ संघांचा समावेश असून, अ-गटात भारत पेट्रोलियमपुढे मुंबईच्याच बँक ऑफ बडोदाचे कडवे आव्हान असेल. ब-गटातही मुंबई बंदर आणि महिंद्रा अँड महिंद्राची लढत चुरशीची होईल.
महिला विभागात आठ संघांचा समावेश असून, अ-गटात मुंबईचा शिवशक्ती महिला संघ आणि उपनगरचा महात्मा गांधी स्पोर्ट्स क्लब हे दोन बलाढ्य संघ आहेत, तर ब-गटात पुण्याच्या राजमाता स्पोर्ट्स क्लबचा समावेश आहे. त्यामुळे शिवशक्ती विरुद्ध राजमाता याच संघांमध्ये अंतिम सामना रंगण्याची दाट शक्यता आहे.
राज्यपातळीवरील व्यावसायिक पुरुष गटातील विजेत्या, उपविजेत्या आणि उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांना चषकांसह अनुक्रमे ७५ हजार रुपये, ४५ हजार रुपये आणि १५ हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात येईल. याचप्रमाणे महिला गटातील विजेत्या, उपविजेत्या आणि उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांना चषकांसह अनुक्रमे ४१ हजार रुपये, २१ हजार रुपये आणि ११ हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात येईल. याचप्रमाणे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात येईल. तसेच स्पर्धेतील सर्वोत्तम चढाईपटू, स्पर्धेतील सर्वोत्तम पकडपटू आणि दिवसाचा सर्वोत्तम खेळाडू ही बक्षिसे देण्यात येणार आहेत, अशी माहिती स्पर्धेचे मार्गदर्शक फिरोझ पठाण यांनी दिली.
गटवारी
व्यावसायिक पुरुष गट
अ-गट : भारत पेट्रोलियम (मुंबई), बँक ऑफ बडोदा (मुंबई), पिंपरी-चिंचवड चॅलेंजर्स (पुणे)
ब-गट : मुंबई बंदर (मुंबई), महिंद्रा अँड महिंद्रा (मुंबई), रिझव्र्ह बँक (मुंबई)
क-गट : प्राप्तीकर (पुणे), सेंट्रल बँक (मुंबई), मुंबई महानगरपालिका (मुंबई)
ड-गट : युवा पलटण (मुंबई), न्यू इंडिया इन्शुरन्स (मुंबई), ठाणे महानगरपालिका (ठाणे)
महिला गट
अ-गट : शिवशक्ती महिला संघ (मुंबई), महात्मा गांधी स्पोर्ट्स क्लब (उपनगर), डॉ. शिरोडकर स्पोर्ट्स क्लब (मुंबई), कर्नाळा स्पोर्ट्स क्लब (रायगड)
ब-गट : स्वराज्य क्रीडा मंडळ (उपनगर),राजमाता स्पोर्ट्स क्लब (पुणे), स्वामी समर्थ क्रीडा मंडळ (मुंबई), जय हनुमान क्रीडा मंडळ (सातारा)

 193 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.