शिवशक्ती-धुळे, डॉ.शिरोडकर, विश्वशांती, स्वामी समर्थ यांची महिला गटात विजयी सलामी

    बंड्या मारुती सेवा मंडळ स्थानिक पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा-२०२३.

मुंबई :  शिवशक्ती-धुळे, डॉ.शिरोडकर, विश्वशांती, स्वामी समर्थ यांची बंड्या मारुती सेवा मंडळ आयोजित “आमदार चषक” स्थानिक पुरुष-महिला गट कबड्डी स्पर्धेच्या  महिला गटात विजयी सलामी. पहिल्याच दिवशी ठाण्याच्या महिला संघांना अपयश. पुरुषांत जयभारत, गुड मॉर्निंग, गोलफादेवी, स्वस्तिक, सत्यम सेवा, मिड-लाईट, विजय क्लब, शिवशंकर यांनी साखळीत पहिल्या विजय नोंदविला. ना. म. जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखाना येथे सुरू झालेल्या महिलांच्या क गटात धुळ्याच्या शिवशक्तीने ठाण्याच्या माऊली प्रतिष्ठानचा ३८-३० असा पराभव करीत या उदघाटनिय सामन्यात विजयी सलामी दिली. ऋतुजा बांदिवडेकर, राणी गुप्ता यांच्या चढाई-पकडीच्या खेळाने विश्रांतीला २७-१३ अशी आघाडी घेणाऱ्या शिवशक्तीने नंतर सावध खेळ करीत हा विजय साकारला. शिवशक्तीच्या या सावध खेळाचा फायदा घेत माऊलीच्या प्रीती विश्वकर्मा, मोनिका मारिया यांनी संघाची पिछाडी भरून काढण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. 
महिलांच्या ब गटात डॉ. शिरोडकरने मेघा कदम, क्षितीज हिरवे यांच्या धारदार चढाया, नेहा कदमच्या भक्कम बचावाच्या बळावर ३८-२० असे नमवित पहिल्या साखळी विजयाची नोंद केली. पहिल्या डावात २१-१० अशी शिरोडकरकडे आघाडी होती. होतकरूच्या प्राजक्ता पुजारी, वेदिका बावेकर बऱ्या खेळल्या. अ गटात विश्वशांतीने ठाण्याच्या ज्ञानशक्तीचा ३४-२९ असा पाडाव केला. मध्यांतराला रोझा डिसोझा, शीतल मेगधे यांच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर १९-१० अशी आघाडी घेणाऱ्या विश्वशांतीला मध्यांतरानंतर ज्ञानशक्तीच्या प्रतीक्षा गावडे, दिव्या सावंत यांनी विजयासाठी चांगलेच झुंजविले. श्री स्वामी समर्थने ड गटात अमरहिंदवर ३२-१६ अशी सहज मात केली. साक्षी जंगम, साक्षी गिलबिले यांच्या चढाई-पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. 
पुरुषांच्या ब गटात चुरशीने खेळल्या गेलेल्या सामन्यात जय भारतने पूर्वार्धातील ११-१६ अशा ५गुणांच्या पिछाडीवरून उपनगरच्या अंबिकाचा प्रतिकार ३४-२५ असा मोडून काढला. सागर काविलकर, निखिल पाटील यांच्या चतुरस्त्र खेळाला या विजयाचे श्रेय जाते. अंबिकाच्या योगेश जगदाळे, राहुल टकले यांची मात्रा उत्तरार्धात चालली नाही. गुड मॉर्निंगने क गटात ठाण्याच्या हनुमान सेवा मंडळाला २७-२२ असे पराभूत केले. विश्रांतीला १ गुणाची आघाडी हनुमान संघाकडे होती. साहिल राणे, स्वप्नील भादवनकर नवोदितकडून, तर हृतिक गवडा, गौरव भोसले हनुमानकडून उत्कृष्ट खेळले. रायगडच्या मिडलाईटने ह गटातील अटीतटीच्या लढतीत पहिल्या सत्रातील १०-१५ अशा ५ गुणांच्या पिछाडीवरून मुंबई शहरच्या लायन्स स्पोर्ट्सचा २५-२३ असा पाडाव केला. धीरज बेनमारे याच्या आक्रमक चढाया व सौरभ वायकर याचा भक्कम बचाव यामुळे मिड लाईट संघाने विजयाची किमया साधली. विशाल करकरे, बाजीराव होडगे यांचा खेळ दुसऱ्या सत्रात ढेपालला. 
पुरुषांच्या फ गटात उपनगरच्या सत्यम सेवाने ठाण्याच्या मोरया मंडळावर ४८-३४ असा विजय मिळविला. पूर्वार्धात २३-०८ अशी आश्वासक आघाडी सत्यमने घेतली  होती. सत्यमच्या या विजयाचे श्रेय नितीन देशमुख, राजेश साळुंखे यांच्या चढाई-पकडीच्या खेळाला जाते. मोरयाच्या धीरज तरे, चैतन्य माळी यांनी उत्तरार्धात आपला खेळ उंचावत सामन्याची रंगत वाढविली. पण संघाला विजयी करण्यात ते अपयशी ठरले. गोलफादेवीने ड गटात ठाण्याच्या उजाला मंडळाचा ३८-३२ असा पाडाव केला. अक्षय बिडू, साईल हरचकर, तुषार दुडये यांच्या उत्कृष्ट खेळाने गोल्फादेवीने २०-१४ अशी महत्वपूर्ण आघाडी घेतली होती. शेवटी हीच आघाडी त्यांच्या कामी आली. उत्तरार्धात उजालाच्या अक्षय भोईर, मिहीर पाटील यांनी कडवी लढत दिली. या स्पर्धेचे उद्घाटन माजी मंत्री व स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमिताने अहमदनगर येथे झालेल्या “७०व्या वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत” #सुवर्ण चढाईत# १६वर्षांनंतर विजयी ठरलेल्या मुंबई शहर संघाचा संघनायक संकेत सावंत याचा आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

 157 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.