चेंदणी कोळीवाड्यातील विठ्ठल मंदिरापासून सुरु झालेल्या शोभयात्रा चेंदणी बंदरावर दाखल झाल्यावर कोळी महोत्सवात रंग भरायला सुरुवात झाली.
ठाणे : पारंपारिक वेशभूषा, पायांना आपसूक ठेका धरायला लावणारे लोकसंगीत आणि कोळी पद्धतीने बनवलेल्या जेवणाची साथ यामुळे चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंच आयोजित कोळी महोत्सव मोठया उत्साहात पार पडला.
कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्षे कोळीमहोत्सव झाला नव्हता. त्यामुळे यंदा कोळीमहोत्सवाला चाहत्यांचा प्रतिसाद कसा मिळेल याची धाकधुक आयोजकांना होती. पण कोळी गाणी, नृत्य यावर उपस्थित प्रेक्षकांनी धरलेला ताल, खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर खवय्यांची उसळलेली गर्दी पाहिल्यावर आयोजकांनी सुटकेचा निश्वास टाकला. चेंदणी कोळीवाड्यातील विठ्ठल मंदिरापासून सुरु झालेल्या शोभयात्रा चेंदणी बंदरावर दाखल झाल्यावर कोळी महोत्सवात रंग भरायला सुरुवात झाली. ऍड रमाकांत कोळी, भगवान कोळी आणि त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते द्वीपप्रज्वलन करून कोळी महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर स्थानिक गायक आणि लहान मोठ्या कलाकारांनी आपल्या नृत्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या कोळी महोत्सवाचे औचित्य साधून विविध क्षेत्रांत भरीव कामगिरी करणाऱ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. स्थानिक आमदार आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, माजी महापौर नरेश म्हस्के, केदार दिघे, माजी नगरसेवक भरत चव्हाण, मालती पाटील, मंगेश कोळी, मनोज शिंदे, सचिन शिंदे, डॉ विजय जोशी आणि इतर मान्यवरांनी यावेळी उपस्थिती लावली.
16,532 total views, 3 views today