भारत पेट्रोलियम व शिवशक्ती ठरले “ग. द. आंबेकर चषकाचे” मानकरी

रिशांक देवाडीगा, पूजा यादव स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. राष्ट्रीय मिल मजदूर संघ “अमृत महोत्सवी वर्ष” राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष व स्थानिक महिला गट कबड्डी स्पर्धा-२०२२.


मुंबई : राष्ट्रीय मिल मजदूर संघाने “अमृत महोत्सवी वर्षानिमित्त” आयोजित व्यावसायिक पुरुष व महिला गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत भारत पेट्रोलियम व शिवशक्ती महिला संघाने विजेतेपद पटकाविले. भारत पेट्रोलीयमचा रिशांक देवाडीगा पुरुषांत, तर शिवशक्तीची पूजा यादव महिलांत स्पर्धेतील “सर्वोत्तम खेळाडू” ठरले. दोघांना प्रत्येकी रोख रु.पाच हजार(₹५,०००/-) देऊन गौरविण्यात आले. ना.म.जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखाना येथे संपन्न झालेल्या व्यावसायिक पुरुषांच्या अंतिम सामन्यात भारत पेट्रोलीयमने बँक ऑफ बडोदाचे आव्हान २७-१७ असे परतवून लावत रोख रु. पन्नास हजार (₹५०,०००/-) व #ग. द. आंबेकर चषकावर# आपले नाव कोरले. उपविजेत्या बँकेला चषक व रोख रु. पंचवीस हजार (₹२५,०००/-)वर संतुष्ट व्हावे लागले. सुरवात आक्रमक करीत भारत पेट्रोलियम संघाने बॅँकेवर पहिला लोण चढवित आघाडी घेतली. विश्रांतीला १८-११ अशी आघाडी पेट्रोलियम संघाकडे होती. उत्तरार्धात सावध खेळ करीत ही आघाडी टिकविली. अक्षय सोनी, रिशांक देवाडीगा यांच्या संयमी व कल्पक चढाया, त्याला विशाल माने यांनी भक्कम बचाव करीत दिलेली उत्तम साथ यामुळे हे शक्य झाले. बॅँकेच्या नितीन देशमुख, साहिल राणे यांचा पूर्वार्धातील जोश उत्तरार्धात कमी पडला.
महिलांच्या अंतिम सामन्यात शिवशक्ती महिला संघाने डॉ.शिरोडकर स्पोर्ट्सचा प्रतिकार ३८-१६ असा लीलया मोडून काढत ग. द. आंबेकर चषक व रोख रुपये पन्नास हजार(₹५०,०००/-) आपल्या खात्यात जमा केले. उपविजेत्या शिरोडकरला चषक व रोख रुपये पंचवीस हजार (₹२५,०००/-) वर समाधान मानावे लागले. या अगोदर झालेल्या शिवनेरी मंडळ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत हे दोन संघ अंतिम फेरीत एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्यावेळी शिरोडकरने शिवशक्तीला विजयासाठी झुंजविले होते. पण आज नांगी टाकली. सुरुवातीपासून जोशपूर्ण खेळ करीत शिवशक्तीने पहिला लोण चढवित आघाडी घेतली. पहिल्या डावात २२-०८ अशी आघाडी घेणाऱ्या शिवशक्तीने दुसऱ्या डावात देखील तोच जोश कायम ठेवत दुसरा लोण दिला. आणि सामन्यावर निर्विवाद वर्चस्व राखले. शिवशक्तीने ४ बोनस गुण घेत, एक अव्वल पकड देखील केली. पूजा यादव, सोनाली शिंगटे यांच्या झंजावाती चढाया, त्याला साधना विश्वकर्मा, पौर्णिमा जेधे यांनी भक्कम बचाव करीत दिलेली मोलाची साथ यामुळे २२गुणांच्या मोठ्या फरकाने शिवशक्तीने विजय साकारला. पूर्ण स्पर्धा आपल्या चतुरस्त्र खेळणे गाजविणाऱ्या क्षितीज हिरवे, मेघा कदम यांचा प्रतिकार या सामन्यात मात्र अत्यंत दुबळा ठरला. यामुळेच शिरोडकरने एकतर्फी हा सामना गमावला.
या आगोदर झालेल्या व्यावसायिक पुरुषांच्या उपांत्य सामन्यात भारत पेट्रोलियमने मध्य रेल्वे(विभाग) संघाचा ४०-११ असा, तर बँक ऑफ बडोदाने न्यू इंडिया एन्शुरन्सचा ३५-२९ असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली होती. तर महिलांत शिवशक्तीने महात्मा गांधी स्पोर्ट्सचा ४७-१८ असा, डॉ. शिरोडकरने अमरहिंदचा २९-११ असा पराभव करीत अंतिम फेरीत धडक दिली होती. उपांत्य उपविजयी चारही संघांना प्रत्येकी चषक व रोख रु. अकरा हजार (₹११,०००/-) देऊन सन्मानित करण्यात आले. बँक ऑफ बडोदाच्या नितीन देशमुख व साहिल राणे हे व्यावसायिक पुरुषांत स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई व पकडीचे खेळाडू ठरले. दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी रोख रु. तीन हजार(₹३,०००/-) देऊन गौरविण्यात आले. डॉ. शिरोडकरची मेघा कदम व शिवशक्तीची पौर्णिमा जेधे महिलांत स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई व पकडीचे खेळाडू ठरले. दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी रोख रु. तीन हजार(₹३,०००/-) प्रदान करून गौरविण्यात आले. या स्पर्धेचे बक्षीस वितरण राष्ट्रीय मिल मजदूर संघाचा अध्यक्ष आमदार सचिन अहिर, सरचिटणीस गोविंदराव मोहिते, क्रीडाप्रेमी महेश सावंत, स्पर्धा निरीक्षक शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त संघटक मिनानाथ धानजी, शिवछत्रपती पुरस्कार आनंदा शिंदे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

 179 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.