राष्ट्रीय मिल मजदूर संघ “अमृत महोत्सवी वर्ष” राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष व स्थानिक महिला गट कबड्डी स्पर्धा-२०२२.
मुंबई : शिवशक्ती महिला संघ, महात्मा गांधी स्पोर्ट्स, अमरहिंद मंडळ, डॉ. शिरोडकर स्पोर्ट्स यांनी राष्ट्रीय मिल मजदूर संघाने “अमृत महोत्सवी वर्षानिमित्त” आयोजित केलेल्या महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली. व्यावसायिक पुरुषांत भारत पेट्रोलियम, मध्य रेल्वे(विभाग), बँक ऑफ बडोदा, न्यू इंडिया एन्शुरन्स यांनी उपांत्य फेरी गाठली. शिवशक्ती विरुद्ध महात्मा गांधी, अमरहिंद विरुद्ध डॉ.शिरोडकर अशा महिलांत, तर भारत पेट्रोलियम विरुद्ध मध्य रेल्वे(विभाग), बँक ऑफ बडोदा विरुद्ध न्यू इंडिया एन्शुरन्स अशा व्यावसायिक पुरुषांत उपांत्य लढती होतील. महिलांच्या उपांत्यपूर्व सामन्यात मुंबई शहरच्या शिवशक्तीने ठाण्याच्या होतकरूला ३१-१३ असे सहज नमवित आपली विजयी दौड सुरू ठेवली. संभाव्य विजेत्या शिवशक्तीने पूर्वार्धातच १९-०९ अशी आघाडी घेत विजयाचा पाया रचला होता. उत्तरार्धात सावध खेळ करीत त्यावर शिक्कामोर्तब केले. प्रतीक्षा तांडेल, रिया मडकईकर यांच्या आक्रमक चढाया, साधना विश्वकर्मा, पौर्णिमा जेधे यांचा भक्कम बचाव यामुळे हा विजय सोपा झाला. होतकरूची चैताली बोऱ्हाडे एकाकी लढली.
दुसऱ्या सामन्यात उपनगरच्या महात्मा गांधीने पालघरच्या ऋषी वाल्मिकीला ४५-१६ असे लीलया पराभूत केले. मध्यांतरालाच ३१-०६ अशी मोठी आघाडी घेत महात्मा गांधीने आपला विजय निश्र्चित केला होता. उत्तरार्धात सावध खेळ करीत त्यावर कळस चढविला. आंतर राष्ट्रीय खेळाडू सायली जाधव, करीना कामतेकर यांच्या झंजावाती चढाया, स्नेहल चिंदरकरचा भक्कम बचाव यामुळेच हे सहज शक्य झाले. ऋषी वाल्मिकीच्या हर्षा शेट्टीची मात्रा या सामन्यात चालली नाही. मुंबई शहराच्या डॉ. शिरोडकरने पालघरच्या कुर्लाई स्पोर्ट्सचा ५४-२८ असा पराभव केला. पहिल्या सत्रात २५-१७ अशी आघाडी घेणाऱ्या शिरोडकरने दुसऱ्या सत्रात अधिक जोशपूर्ण खेळ करीत गुणांचे अर्धशतक पार केले. क्षितिजा हिरवे, मेघा कदम यांच्या सर्वांगसुंदर खेळाला या मोठ्या विजयाचे श्रेय जाते. पूजा पाटील, रेणुका नम कुर्लाईकडून चमकल्या. शेवटच्या सामन्यात मुंबई शहराच्या अमरहिंदने धुळ्याच्या शिवशक्तीचा ३२-२७ असा पाडाव करीत उपांत्य फेरी गाठली. पहिल्या डावात १२-१२ अशा समान गुणांवर असणाऱ्या अमरहिंदने दुसऱ्या डावात टॉप गिअर टाकत विजय आपल्या बाजूने झुकविला. ऋतुजा बांदिवडेकर, पूजा कदम, रक्षा जाधव यांच्या संयमी खेळाला या विजयाचे श्रेय जाते. शिवशक्तीच्या दिव्या यादव, श्रद्धा कदम यांनी सुरवातीला कडवी लढत दिली. पण उत्तरार्धात त्या थोड्या कमी पडल्या.
व्यावसायिक पुरुष गटात भारत पेट्रोलीयमने अक्षय सोनी, आकाश रूडले, हितेश थळे यांच्या चढाई-पकडीच्या खेळाच्या बळावर सी.जी. एस. टी.चा ३३-२१ असा पाडाव केला. विश्रांतीला १९-१० अशी आघाडी पेट्रोलियम संघाकडे होती. सी.जी.एस.टी.च्या सुनील साळुंखे, मयूर शिवतरकर यांनी कडवी लढत दिली. मध्य रेल्वेने मुंबई महानगर पालिकेचे कडवे आव्हान २७-२१ असे संपुष्टात आणले. विश्रांतीला १०-०९अशी नाममात्र आघाडी रेल्वेकडे होती. उत्तरार्धात संयमी खेळ करीत रेल्वेने हा विजय साकारला. जी. स्वप्नील, टी. महेश रेल्वेकडून, तर आकाश पाटील, राहुल सवर मुंबई पालिकेकडून उत्तम खेळल्या.
बँक ऑफ बडोदाने मध्यांतरातील ११-१३ अशा २गुणांच्या पिछाडीवरून ठाणे महानगर पालिकेचा प्रतिकार ३२-२६ असा मोडून काढत उपांत्य फेरी गाठली. बँकेच्या तनुज राणे, नितीन देशमुख, प्रणय राणे यांनी मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावत ही किमया साधली. ठाण्याचे धनंजय सरोज, राजू किशोर, अक्षय भोईर यांच्या खेळ शेवटच्या सत्रात कमी पडला. शेवटच्या सामन्यात न्यू इंडिया एन्शुरन्सने सेन्ट्रल बँकेला ३३-३० असे चकवीत उपांत्य फेरी गाठली. मध्यांतराला १७-०८अशी आघाडी घेणाऱ्या न्यू इंडियाला दुसऱ्या डावात मात्र बँकेने कडवी झुंज दिली. पण शेवटी ३गुणांनी न्यू इंडियाने बाजी मारली. अभिषेक नर, राज चव्हाण, नितीन घोगळे या विजयाचे शिल्पकार ठरले. बँकेकडून जितेंद्र कदम, निखिल कदम यांनी शेवटच्या क्षणापर्यंत शर्थीची लढत दिली. पण संघाला विजयी करण्यात ते अपयशी ठरले.
310 total views, 1 views today