विजय क्रिकेट क्लबने पार्कोफिनला चकवले

जाग्रवी आणि जान्हवीने आक्रमक फलंदाजी करत संघाला विजयपथावर नेले. विजय क्रिकेट क्लबने १४.४ षटकात पाच फलंदाजांच्या मोबदल्यात ९९ धावा करत आपले लक्ष्य पार केले.विजय क्रिकेट क्लबने पार्कोफिनला चकवले

ठाणे : स्पर्धेत सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करणाऱ्या जान्हवी काटे आणि जाग्रवी पवारच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर विजय क्रिकेट क्लबने गतविजेत्या पार्कोफिन क्रिकेट क्लबवर पाच विकेट्सनी विजय मिळवत अर्जुन मढवी स्मृती टी ट्वेन्टी महिला लीग क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत स्थान मिळवले. उपांत्य फेरीच्या अन्य लढतीत विधी मथुरियाने पाच विकेट्स मिळवत दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन संघाला सलग तिसऱ्यांदा स्पर्धेच्या निर्णायक लढतीत स्थान मिळवून दिले.
सेंट्रल मैदानावर रंगलेल्या सामन्यात कोमल परब, बतुल परेरा, जान्हवी काटे आणि जाग्रवी पवारने भेदक गोलंदाजी करत पार्कोफिन क्रिकेट क्लबला १७ षटकात ९६ धावांवर गुंडाळले. १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झालेल्या हुर्ली गाला (२५), सेजल राऊत (१६) आणि सायली सातघरेने १५ धावा केल्या. कोमल परबने १६ धावांत ३, बतुल परेराने २१ धावांत ३, जान्हवी काटेने १४ धावांत २ आणि जाग्रवी पवारने सात धावांत एक फलंदाज बाद केला. या छोट्या आव्हानाचा बचाव करताना पार्कोफिनच्या गोलंदाजांनी सुरुवातीला फलंदाजांवर अंकुश ठेवला होता. पण जाग्रवी आणि जान्हवीने आक्रमक फलंदाजी करत संघाला विजयपथावर नेले. विजय क्रिकेट क्लबने १४.४ षटकात पाच फलंदाजांच्या मोबदल्यात ९९ धावा करत आपले लक्ष्य पार केले. जान्हवीने नाबाद २६ धावा केल्या. जाग्रवी पवारने ३७ आणि सायली टेमकरने २१ धावा केल्या. पराभुत संघाच्या सायली सातघरे, वृषाली भगत आणि त्रिशा परमारने प्रत्येकी एक विकेट मिळवली.
अन्य लढतीत दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन संघाच्या विधी मथुरियाने तीन षटकात दोन निर्धाव षटकासह अवघी एक धाव देत स्पोर्टिंग क्लब कमिटीचा अर्धा संघ तंबूत परत पाठवला. विधीच्या भेदक गोलंदाजीमुळे स्पोर्टिंग क्लबचा डाव १५.२ षटकात अवघ्या ५६ धावांवर आटोपला. त्यांच्या निधी दावडाचा (१०) अपवाद वगळता एकाही फलंदाजाला धावांचा दुहेरी आकडा गाठता आला नाही. फातिमा जाफरने दोन धावांच्या मोबदल्यात दोन विकेट्स मिळवत विधीला चांगली साथ दिली. आचल वळंजूने नाबाद ४० धावांची खेळी करत ११ व्या षटकात संघाला विजय मिळवून दिला.दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन संघाने १ बाद ५७ धावा केल्या. या डावातील एकमेव फलंदाज रोमा तांडेलने बाद केला.
संक्षिप्त धावफलक –
पार्कोफिन क्रिकेट क्लब : १७ षटकात सर्वबाद ९६ ( हर्ली गाला २५, सेजल राऊत १६, सायली सातघरे १५, कोमल परब ४-१६-३, बतुल परेरा ४-२१-३, जान्हवी काटे ३-१४-२, जाग्रवी पवार २-७-१) पराभुत विरुद्ध विजय क्रिकेट क्लब : १४.४ षटकात ५ बाद ९९ ( सायली टेमकर २१, जाग्रवी पवार ३७, जान्हवी काटे नाबाद २६, सायली सातघरे ४-१०-१, वृषाली भगत ४-२०-१, त्रिशा परमार २-१९-१) सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू – जान्हवी काटे.
स्पोर्टिंग क्लब कमिटी : १५.२ षटकात सर्वबाद ५६ ( निधी दावडा १०, विधी मथुरिया ३-२-१-५, फातिमा जाफर ३.२-१-२) पराभुत विरुद्ध दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन : १०.२ षटकात १ बाद ५७ ( आचल वळजू नाबाद ४०, रोमा तांडेल ३-१०-१) सर्वोत्तम खेळाडू – विधी मथुरिया.

 6,397 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.