मुंबई उपनगरला विजेतेपदाचा दुहेरी मुकुट

४९वी कुमार-कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा-परभणी-२०२२. स्पर्धेत प्रथमच संघांना “रिव्ह्यू” मागण्याची देण्यात आली संधी.

परभणी : मुंबई उपनगरने “४९व्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत” दोन्ही विभागात विजेतेपद पटकावित “दुहेरी मुकुट” मिळविला. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या मान्यतेने परभणी जिल्हा कबड्डी संघटनेने मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठानच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन केले होते. गंगाखेड-परभणी येथील माणिकराव गुट्टे क्रीडानगरीत झालेल्या मुलींच्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगरने चुरशीच्या लढतीत पुण्याचे आव्हान ३५-३३ असे परतवीत “क्रीडा शिक्षक चंदन सखाराम पांडे चषकावर” आपले नाव कोरले. तर कुमार गटाच्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगरने अहमदनगरचा प्रतिकार २४-२३ असा मोडून काढत “स्व. प्रभाकर नागो पाटील चषक” आपल्या नावे केला. २००२साली उपनगरने ही किमया केली होती. २०वर्षांनंतर पुन्हा एकदा हा योग जुळून आला. अहमदनगरच्या मुलांनी आक्रमक सुरुवात करीत सलग ४गुण घेतले. ४मिनिटानंतर व ४ गुणानंतर उपनगरने पहिला गुण घेत आपले खाते उघडले. त्यानंतर मात्र सामन्यात चुरस पहावयास मिळाली. अहमदनगरने सुरुवाती पासून सामन्यावर वर्चस्व राखत मध्यांतराला ११-०८ अशी आघाडी घेतली होती. मध्यांतरानंतर देखील ७-८मिनिटे नगरकडे आघाडी होती. त्यानंतर मात्र उपनगरने जोरदार मुसंडी मारली. हळूहळू गुण घेत उपनगरने आघाडी कमी करत आणली. शेवटी रजतसिंग यांने शिलकी २गडी टिपत अहमदनगर वर लोण देत १५-१२अशी आघाडी घेतली. त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिले नाही. शेवटची ५मिनिटे शिल्लक असताना २२-१७अशी उपनगरकडे आघाडी होती. शेवटी उपनगरने एका गुणाने बाजी मारली. शेवटच्या काही मिनिटात आदित्य गजमालने डाव्या मध्यरक्षक म्हणून केलेल्या धाडशी पकडी या विजयात महत्वाच्या ठरल्या. त्याला चढाईत रजतसिंग याची मोलाची साथ लाभली. अहमदनगरच्या शिवम पठारे, सौरभ मैडे यांचा चौफेर खेळ शेवटच्या काही मिनिटात ढासळला.त्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
मुलींचा अंतिम सामना देखील अटीतटीचा झाला. पहिल्या चढाई पासून सामन्याला बरोबरीने सुरुवात झाली. विश्रांतीला दोन्ही संघ १४-१४ अशी बरोबरी होती. विश्रांतीनंतर काहीच मिनिटात उपनगरने पुण्यावर लोण देत २३-२१ अशी आघाडी घेतली. पण पुन्हा एकदा २३-२३ अशी बरोबरी झाली. शेवटची ५मिनिटे पुकारली तेव्हा २६-२५ अशी उपनगरकडे आघाडी होती. पण संयमाने खेळ करीत उपनगरने २गुणाने बाजी मारली. हरजित संधू हिच्या धूर्त व संयमी चढाया तिला याशिका पुजारी व स्नेहल चिंदरकरची मिळालेली चढाई-पकडीची महत्वपूर्ण साथ यामुळे हा विजय शक्य झाला. मंदिरा कोमकर, निकिता पडवळ, गौरी तांडकर यांच्या आक्रमक खेळाच्या बळावर सामन्याच्या सुरुवातीला आघाडी राखणाऱ्या पुण्याला उत्तरार्धात मात्र आपला खेळ उंचावता आला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा पुण्याला उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले. या अगोदर झालेल्या कुमारांच्या उपांत्य सामन्यात मुंबई उपनगरने पुण्याला २६-२२ असे, तर अहमदनगरने ठाण्याला ३२-२४ असे पराभूत करीत अंतिम फेरीत धडक दिली होती. तर कुमारी गटात मुंबई उपनगरने यजमान परभणीला ४८-३२ असे, तर पुण्याने मुंबई शहरला ५१-३२ असे नमवित अंतिम फेरी गाठली होती. या स्पर्धेचे बक्षीस वितरण महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे व स्थानिक आमदार, आयोजक डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने या स्पर्धेत प्रथमच जिल्हा संघांना “रिव्ह्यू” घेण्याची संधी “स्पोर्ट्स-वोट” च्या सहकार्याने प्रायोजिक तत्वावर उपलब्ध करून दिली. ही जबाबदारी मुंबईच्या शशिकांत राऊत व जळगांवच्या संजय विचारे यांनी यथाशक्ती पार पाडली.

 179 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.