डॉ. प्रज्ञा दया पवार यांना गंगाधर गाडगीळ साहित्य पुरस्कार जाहीर

डॉ. प्रज्ञा दया पवार या ज्ञानसाधना महाविद्यालयामध्ये मराठी विषयाच्या विभागप्रमुख आहेत. काव्य, ललित लेखन, नाट्य, कथा आदी सर्वच साहित्य प्रकारात त्यांनी मुशाफिरी आहे.

ठाणे : प्रख्यात कवयित्री प्रा. डॉ. प्रज्ञा दया पवार यांना यंदाचा गंगाधर गाडगीळ साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. येत्या शुक्रवारी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
ठाणे येथे वास्तव्यास असणार्‍या डॉ. प्रज्ञा दया पवार या ज्ञानसाधना महाविद्यालयामध्ये मराठी विषयाच्या विभागप्रमुख आहेत. काव्य, ललित लेखन, नाट्य, कथा आदी सर्वच साहित्य प्रकारात त्यांनी मुशाफिरी आहे. त्यांचे उत्कट जीवघेण्या धगीवर, अंतःस्थ हा काव्यसंग्रह, दृश्यांचा ढोबळ समुद्र, मी भिडवू पहातेय समग्राशी डोळा हे काव्यसंग्रह; अर्वाचीन आरण (संमिश्र गद्यलेख); आरपार लयीत प्राणांतिक (दीर्घकविता); केंद्र आणि परीघ,  टेहलटिकोरी (संग्रहित ललित);   धादांत खैरलांजी (नाटक); मी भयंकराच्या दरवाज्यात उभा आहे ( नामदेव ढसाळ यांची निवडक कवितांचे सहसंपादन)  विमुक्तांचे स्वातंत्र्य (सहसंपादन, २०१८, परिवर्तनाचा वाटसरू प्रकाशन, ठाणे) आणि  अफवा खरी ठरावी म्हणून (कथासंग्रह) प्रकाशित झाले आहेत. विशेष म्हणजे, अफवा खरी ठरावी हा कथासंग्रह इंग्रजी आणि कन्नड भाषेतही अनुवादीत झाला आहे. प्रज्ञा पवार यांना यापूर्वी मानाचे १४ पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.  
येत्या शुक्रवारी ठाण्यातील मराठी ग्रंथ संग्रहालय येथे सायंकाळी सहा वाजता होणार्‍या कार्यक्रमात अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत ससाणे आणि ज्येष्ठ समीक्षक मिना गोखले यांच्या हस्ते डॉ. प्रज्ञा पवार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

 18,716 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.