यजमान परभणी, मुंबई उपनगर, पुणे, मुंबई शहर, अहमदनगर, ठाणे उपांत्य फेरीत दाखल

    ४९वी कुमार- कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा, कुमार गटातील गतविजेता कोल्हापूर उपांत्यपूर्व फेरीत गारद. राजेश भष्माचे एकाच चढाईत गडी बाद करून देखील रायगड उपांत्यपूर्व फेरीत पराभूत.

परभणी : महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या मान्यतेने परभणी जिल्हा कबड्डी संघटनेने मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठानच्या सहकार्याने आयोजित केलेल्या “४९व्या कुमार – कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत” यजमान परभणी, मुंबई उपनगर, पुणे, मुंबई शहर कुमारी, तर अहमदनगर, ठाणे, मुंबई उपनगर पुणे उपांत्य फेरीत दाखल. अहमदनगर विरुद्ध ठाणे, मुंबई उपनगर विरुद्ध पुणे अशा कुमार, तर मुंबई उपनगर विरुद्ध परभणी, पुणे विरुद्ध मुंबई उपनगर अशा कुमारी गटात उपांत्य लढती होतील. कुमार गतविजेता कोल्हापूर उपांत्यपूर्व फेरीत गारद. कुमारांच्या उपांत्यपूर्व सामन्यात अहमदनगरने बलाढ्य कोल्हापूरला ३०-२५ असे नमवित ही किमया साधली. सुरुवातीपासून वर्चस्व ठेवणाऱ्या नगरकडे पूर्वार्धात १७-११ महत्वपूर्ण आघाडी होती. उत्तरार्धात सावध खेळ करीत ५ गुणांच्या फरकाने नगरनें सामना आपल्या बाजूने झुकविला. ऋषिकेश दाते, युवराज गवारे यांच्या मुत्सद्दी चढाया त्याला राकेश गैड, संकेत खलाटे यांची मिळालेली पकडीची साथ यामुळे नगरने हा विजय मिळविला. आदित्य पवार, साहिल पाटील, युतीराज पोलेकर यांनी कोल्हापूरकडून कडवा प्रतिकार केला. ठाण्याने रत्नागिरीला ३१-२० असे नमवित उपांत्य फेरीत धडक दिली. मध्यांतरापर्यत अत्यंत चुरशीने खेळला गेलेल्या या सामन्यात ११-०९ अशी निसटती आघाडी ठाण्याकडे होती. मध्यांतरानंतर टॉप गिअर टाकत ठाण्याने आपला खेळ गतिमान केला आणि ११गुणांच्या फरकाने सामना खिशात टाकला. निखिल भोईर, यश भोईर, करणं बनकर यांच्या चढाई-पकडीच्या उत्कृष्ट खेळाला या विजयाचे श्रेय जाते. रत्नागिरीच्या अमरसिंग कश्यप, युवराज गुडे, पारस पाटील यांचा खेळ मध्यांतरानंतर थंडावला.
मुंबई उपनगरने रजतसिंग, यश डोंगरे यांच्या चतुरस्त्र चढाया आणि अनुराग फुलारे, साहिल नलावडे यांचा भक्कम बचाव यांच्या जोरावर सांगलीचा ४५-२६ असा सहज पराभव करीत कुमार गटात उपांत्य फेरी गाठली. पूर्वार्धात २६-१० अशी आघाडी घेणाऱ्या उपनगरने उत्तरार्धात सावध खेळ केला. अभिराज पवार, साहिल कुचिवाले यांचा खेळ सांगलीचा पराभव टाळण्यात कमी पडला. पुण्याने रायगडाचे कडवे आव्हान ४३-३३असे परतवून लावले. पूर्वार्धात १३-१९ अशा पिछाडीवर पडलेल्या रायगडाने सामना संपायला काही मिनिटे शिल्लक असताना बरोबरी साधली होती. रायगडच्या राजेश भष्मा याने एकाच चढाईत ४गडी टिपत पुण्यावर लोण देत ही बरोबरी साधली होती. त्याला स्वराज वाळंज, यश पाटील यांनी छान साथ दिली. पण रायगडला विजयी करण्यात ते अपयशी ठरले. रोहित होडशीळ, स्वप्नील कोळी, सुमित घोलप यांच्या चढाई-पकडीच्या सर्वांगसुंदर खेळामुळे पुण्याने हा विजय साकारला. शेवटच्या काही मिनिटात संयमी खेळाच्या जोरावर त्यांना हे शक्य झाले.
कुमारी गटातील उपांत्यपूर्व फेरीत मुंबई उपनगरने सोलापूरचा ५१-२५ असा सरळ पराभव केला. विजेत्यापदाच्या शर्यतीत असलेल्या उपनगरने पहिल्या सत्रात २६-१३ अशी आघाडी घेतली होती. हरजित संधू, याशिका पुजारी यांच्या झंजावाती चढाया त्याला नेहा पांडवची मिळालेली पकडीची भक्कम साथ यामुळे हा विजय सोपा गेला. सोलापूरच्या धनश्री तेली, शिवानी साळुंखे यांनी बरा प्रतिकार केला. दुसऱ्या सामन्यात यजमान परभणीने अत्यंत चुरशीने खेळला गेलेल्या सामन्यात सांगलीचा कडवा प्रतिकार शेवटच्या क्षणी ४२-४० असा मोडून काढत परभणीच्या कबड्डी रसिकाना सुखद धक्का दिला. मध्यांतराला १८-१० अशी आघाडी घेणाऱ्या सांगलीला शेवटच्या ३मिनिटात ही आघाडी टिकविने जमले नाही. कोपरारक्षक सुमन चव्हाण हिने शेवटच्या ३ मिनिटात केलेल्या धाडशी पकडी, तसेच गौरी दाहे, निकिता लंगोटे यांच्या झंजावाती चढाया यामुळे परभणीने हा विजय खेचून आणला. शेवटच्या ३मिनिटात परभणीने १० गुण मिळविले. सांगलीच्या अनुजा शिंदे, ऋतुजा आंबी यांनी पूर्वार्धात उत्कृष्ट खेळ केला. पण शेवटच्या क्षणी त्यांना दडपणाखाली आपला खेळ उंचावता आला नाही. गतउपविजेत्या पुण्याने मंदिरा कोमकर हिच्या आक्रमक चतुरस्त्र खेळाच्या जोरावर रत्नागिरीला ५७-२१ असे लीलया पराभूत केले. विजेतेपदाचे दावेदार असणाऱ्या पुण्याने विश्रांतीला २८-११अशी आघाडी घेत विजयाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले होते. रत्नागिरीची आसावरी बरी खेळली. शेवटच्या सामन्यात मुंबई शहरने ठाण्याचा प्रतिकार ४४-४० असा मोडून काढत उपांत्य फेरीत धडक दिली. मध्यांतराला २१-१८अशी आघाडी घेणाऱ्या मुंबईला दुसऱ्या डावात ठाण्याने विजयासाठी चांगलेच झुंजविले. एक वेळ अशी आली होती की ठाण्याने २६-२६ अशी बरोबरी साधली होती. पण नंतर मात्र मुंबईने शांत व संयमी खेळ करीत मुंबईने बाजी मारत उपांत्य फेरी गाठली. रिद्दी हडकर, भारती यादव, रिया मडकईकर यांच्या झंजावाती चढाया त्यांना लेखा शिंदेंची मिळालेली पकडीची भक्कम साथ त्यामुळे मुंबईला हा विजय शक्य झाला. प्रतीक्षा मार्कंड, निधी राजोळे, साधना यादव यांचा चतुरस्त्र खेळ ठाण्याचा पराभव टाळण्यात थोडा कमी पडला.

 202 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.