बेनब्रीज पिकलबॉल; सहा फ़ेरींच्या थरारक अंतिम सामन्यात मारली बाजी
मुंबई : भारतीय संघाने पिछाडीवरुन जबरदस्त पुनरागमन करताना पिकलबॉल खेळाचा विश्वचषक मानला जाणारा बेनब्रीज चषक पटकावला. टीम इंडिया वायू संघाने चार देशांच्या खेळाडूंचा समावेस असलेल्या टीम पिकलबॉल युनायटेड या आंतरराष्ट्रीय संघाचा ७-६ असा अवघ्या एका गुणाने थरारक पराभव करत पहिल्यांदाच भारतीय संघाने बेनब्रीज चषकावर नाव कोरले.
वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (एनएससीआय) येथे अखिल भारतीय पिकलबॉल संघटनेच्या (एआयपीए) यजमानपदाखाली आणि आंतरराष्ट्रीय पिकलबॉल महासंघाच्या (आयएफपी) मान्यतेने झालेल्या या स्पर्धेत यजमान भारतासह एकूण दहा देशांनी सहभाग घेतला होता. बेनब्रीज चषक पटकावण्यासाठी रंगलेल्या सांघिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दबदबा राखला. सहा फ़ेरींच्या अंतिम सामन्यात पिकलबॉल युनायटेडच्या आदित्य रवी याने बाजी मारताना भारताच्या अरमान भाटियाला १५-११ असे नमवले. यानंतर पिकलबॉल युनायटेडच्या रक्षिका रवीने भारताच्या नइमी मेहताला १५-१४ असे पराभूत केले. पुरुष दुहेरीत पिकलबॉल युनायटेडच्या डॅनियल मूर-जोहानेस वेन्स यांनी भारताच्या गौरव राणे-कश्यप बरनवाल या अव्वल जोडीला १५-४ असे नमवत संघाला ३-० अशी भक्कम आघाडीवर नेत सामन्यावर मजबूत पकड मिळवली.
यानंतर मात्र भारतीय खेळाडूंनी जबरदस्त दबदबा राखला. महिला दुहेरीत वृशाली ठाकरे-नइमी मेहता यांनी वर्षा मुझुमदार-पिनी ली यांचा १५-१२ असा पाडाव केला. मिश्र दुहेरीत अरमान भाटिया-वृशाली ठाकरे यांनी धिरेन पटेल-पिनी ली यांना १५-११ असा धक्का देत भारताची पिछाडी ४-६ अशी कमी केली. यानंतर ३ गुणांची निर्णायक अखेरच्या खुल्या दुहेरी लढतीत हर्ष मेहता-वंशिक कपाडिया यांनी डॅनियल नूर-जोहानेस वेन्स या कसलेल्या जोडीचा १५-५ असा धुव्वा उडवत भारताला ७-६ अशी विजयी आघाडी मिळवून दिली.
मिश्र खेळाडूंच्या संघाला नमवले
भारताच्या खेळाडूंनी जबरदस्त सांघिक खेळ करताना चार देशांच्या खेळाडूंचा समावेश असलेल्या टीम पिकलबॉल युनायटेड संघात भारत, अमेरिका, जपान आणि सिंगापूर येथील खेळाडूंचा समावेश होता. या अव्वल मिश्र आंतरराष्ट्रीय संघाला धक्का देत भारताच्या वायू संघाने सर्वांनाच प्रभावित केले.
अशी होती गुणप्रणाली
अंतिम सामन्यात एकूण सहा लढती खेळविण्यात आले. यामध्ये पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी, महिला दुहेरी, मिश्र दुहेरी आणि खुली दुहेरी अश्या लढती रंगल्या. पहिल्या पाच लढतींसाठी २ गुण ठेवण्यात आले होते. अखेरच्या खुल्या दुहेरी लढतीसाठी ३ गुण होते. त्यामुळेच पहिल्या पाचपैकी २ लढती जिंकून ४-६ असे पिछाडीवर पडलेल्या भारतीयांनी अखेरची निर्णायक लढत जिंकून ७-६ अशी आघाडी घेत बाजी मारली.
346 total views, 1 views today