स्पोर्टिंग क्लब कमिटीची उपांत्य फेरीकडे कूच

संघाला निसटता विजय मिळवून देणाऱ्या निव्या आंब्रे आणि रोमा तांडेलला संयुक्तरित्या सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला.

ठाणे : निव्या आंब्रे आणि रोमा तांडेलच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर स्पोर्टिंग क्लब कमिटी संघाने तीन विकेट्सनी पराभव करत अर्जुन मढवी स्मृती महिला टी -२० क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. पालघर डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशन संघाने दिलेल्या ११९ धावांचे आव्हान शेवटच्या चेंडूवर चौकार मारत रोमा तांडेलने डॉ राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिएशन आणि दैवज्ञ क्रिकेट क्लब आयोजित स्पर्धेत संघाचा सलग दुसरा विजय नोंदवला.
सेंट्रल मैदानावर रंगलेल्या सामन्यात स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या निव्या आंब्रे, इशा आमरे आणि रोमा तांडेलच्या प्रभावी गोलंदाजीमुळे पालघर डहाणू स्पोर्ट्स असोसिएशनला २० षटकात ६ बाद ११९ धावापर्यंत मजल मारता आली. या शतकी धावसंख्येला आकार दिला तो सिद्धेश्वरी पागधरेने. सिद्धेश्वरीने ३२ चेंडूत आठ चौकार आणि एक षटकार मारत धावसंख्येत ५१ धावा जोडल्या. संयुक्ता किणीने २९ धावा केल्या. इशा वर्माने १८ धावांत ३ आणि निव्या आंब्रेने १७ धावांत २ विकेट्स मिळवल्या. रोमा तांडेलने चार षटकात फक्त १३ धावा देत फलंदाजांवर अंकुश ठेवला.
विजयाचे लक्ष्य गाठण्याच्या प्रयत्नात निव्याने अपेक्षेप्रमाणे फलंदाजी करताना तीन चौकार आणि एक षटकारासह ३१ धावा केल्या. निव्या बाद झाल्यावर मधल्या फळीतले फलंदाज झटपट बाद झाल्यामुळे स्पोर्टिंग क्लब कमिटीचा संघ अडचणीत आला. सामना त्यांच्या हातातुन निसटतो की काय अशी परिस्थिती असताना रोमा तांडेलने नाबाद २६ धावांची खेळी करत २० षटकात ७ बाद १२० धावसंख्येसह संघाला विजय मिळवून दिला. संघाला विजयाची आस दाखवताना चंचल सोलंकीने २६ धावांत ३ विकेट मिळवल्या. उन्नती नाईक आणि पौर्णिमा कोठारीने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. संघाला निसटता विजय मिळवून देणाऱ्या निव्या आंब्रे आणि रोमा तांडेलला संयुक्तरित्या सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला.
संक्षिप्त धावफलक –
पालघर डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशन : २० षटकात ६ बाद ११९ ( सिद्धेश्वरी पागधारे ५१, संयुक्ता किणी २९, इशा वर्मा ४-१८-३, निव्या आंब्रे ४-१७-२, रोमा तांडेल ३-१४-०) पराभुत विरुद्ध स्पोर्टिंग क्लब कमिटी : निव्या आंब्रे ३१, रोमा तांडेल नाबाद २६, चंचल सोलंकी ४-२६-३, उन्नती नाईक ४-१२-१, पौर्णिमा कोठारी ४-२८-१) सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू संयुक्तरित्या – निव्या आंब्रे आणि रोमा तांडेल.

 21,864 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.