वालावलचा लक्षमीनारायण संघ ठरला ” विठ्ठल कृष्णाजी धुरी चषकाचा” मानकरी.

लक्ष्मीनारायण संघाचा गिरीश चव्हाण स्पर्धेत “सर्वोत्तम” ठरला.

 कुडाळ : वालावलच्या लक्ष्मीनारायण मंडळाने हरी ओम् मंगल कार्यालयाच्या विद्यमाने आयोजित केलेल्या पुरुष प्रौढगट कबड्डी स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. सिंधुदुर्ग-कुडाळ, वाडीवरवडे येथील हरी ओम् मंगल कार्यालयासमोरील पटांगणावर झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात लक्ष्मीनारायण मंडळाने पिंगुळी-कुडाळच्या श्री गणेश मंडळाचा ५-५ चढाईच्या डावात ३३-२९(८-४) असा पराभव करीत ” विठ्ठल कृष्णाजी धुरी चषकासह रोख रु. सात हजार(₹७,०००/-) आपल्या खात्यात जमा केले. उपविज्येत्या श्री गणेश संघाला “स्व.सत्यभामा विठ्ठल धुरी चषक” व रोख रु. पाच हजार(₹५,०००/-) वर समाधान मानावे लागले. सुरुवाती पासूनच चुरशीने खेळलेल्या या सामन्यात  विश्रांतीला १३-११ अशी लक्ष्मीनारायण संघाकडे आघाडी होती. उत्तरार्धात मात्र श्री गणेशने ही आघाडी भरून काढत २५-२५ अशी पूर्ण डावात बरोबरी केली. सामन्याचा निकाल लावण्यासाठी कबड्डीच्या नियमानुसार ५-५ चढायांचा डाव खेळविण्यात आला. त्यात लक्ष्मीनारायण संघाने ८-४ अशी बाजी मारली. गिरीश चव्हाण याचा सर्वांगसुंदर अष्टपैलू खेळ, त्याला योगेश घाडीची मिळालेली पकडीची भक्कम साथ यामुळे त्यांनी या विजयाला गवसणी घातली. श्री गणेशच्या परेश वालावलकरला या सामन्यात अन्य सहकाऱ्यांची योग्य साथ न लाभल्याने पराभव पत्करावा लागला. 
या अगोदर झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात लक्ष्मीनारायणने रेवतळेच्या महापुरुष संघाचा २३-१३ ; आणि श्री गणेश मंडळाने वेंगुर्ल्याच्या जय मानसीश्वर संघाचा १९-११ असा पराभव करीत अंतिम फेरीत धडक दिली होती. या उपांत्य उपविजयी दोन्ही संघांना प्रत्येकी चषक व रोख रु.तीन हजार(₹३,०००/-) प्रदान करण्यात आले. लक्ष्मीनारायण मंडळाचा गिरीश चव्हाण स्पर्धेत “सर्वोत्तम खेळाडू” ठरला. त्याला रोख रु.एक हजार पाचशे(₹१,५००/-) देऊन गौरविण्यात आले. लक्ष्मीनारायणचा योगेश घाडी स्पर्धेत उत्कृष्ट पकडीचा, तर श्री गणेशचा परेश वालावलकर स्पर्धेत उत्कृष्ट चढाईचा खेळाडू ठरला. दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी रोख रु. एक हजार(₹१,०००/-)देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत १६ संघानी सहभाग घेतला होता. शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त संघटक मिनानाथ धानजी, राजेश सिंगनाथ व इतर कार्यकर्त्यांनी स्पर्धा आयोजक बाळकृष्ण धुरी यांना मोलाचे सहकार्य केल्यामुळे ही स्पर्धा मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली.

 192 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.