स्वामी समर्थ महिला, गोल्फादेवी प्रतिष्ठान, शिवशक्ती अ – ब, विश्वशांती कुमारी गटात तिसऱ्या फेरीत

   मुंबई शहर कुमार,कुमारी गट निवड चाचणी कबड्डी स्पर्धा – २०२२-२३.

  मुंबई : स्वामी समर्थ महिला, गोल्फादेवी प्रतिष्ठान, शिवशक्ती – अ आणि ब, विश्वशांती यांनी मुंबई शहर कबड्डी संघटनेने आयोजित केलेल्या कुमारी गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत धडक दिली. वडाळा- मुंबई येथील भारतीय क्रीडा मंदिरात सुरू असलेल्या कुमारी गटाच्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात स्वामी समर्थ महिला संघाने अमरहिंद मंडळाचा ३९-२३ असा पराभव केला विश्रांतीपर्यंत अत्यंत चुरशीने खेळला गेलेल्या या सामन्यात १५-१४ अशी स्वामी समर्थकडे आघाडी होती. विश्रांतीनंतर टॉप गिअर टाकत समर्थने भराभर गुण मिळवीत सामना आपल्या बाजूने झुकविला. मानसी पवार, सई शिंदे यांच्या चढाई- पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. अमरहिंदच्या सलोनी नाक्ती, शाल्मली खडपे यांनी सुरुवातीला कडवी लढत दिली. नंतर मात्र त्यांच्या खेळ दुबळा ठरला. गोल्फादेवी प्रतिष्ठानने धारावी महिला संघाला ४३-२६ असे नमवित आपली आगेकूच सुरू ठेवली. मध्यांतराला २३-०५ अशी आघाडी विजयी संघाकडे होती. अस्मिता जंगम, रचना म्हात्रे यांच्या चतुरस्त्र खेळाला या विजयाचे श्रेय जाते. धारावी महिला संघाच्या गौरी, वैष्णवी यांना दुसऱ्या डावात सूर सापडला. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. 
शिवशक्ती (ब) संघाने चंद्रोदय मंडळाचा ६०-२७ असा लीलया पराभव केला. पहिल्या डावात २९-१३ अशी विजयी संघाकडे आघाडी होती. रिद्धी हडकर हिच्या तुफानी चढाया तिला कशीशने दिलेली पकडीची साथ यामुळे शिवशक्तीने मोठ्या फरकाने हा सामना जिंकला. चंद्रोदयच्या साक्षी, ऋतुजा बऱ्या खेळल्या. शिवशक्तीच्या ब संघाबरोबरच शिवशक्ती अ संघाने देखील प्रभाभवानी मंडळाचा ४४-१३ असा पाडाव करीत आगेकूच कायम राखली. रिया मंडकाईकर, स्वरा शिर्के यांचा चढाई-पकडीचा खेळ या विजयात महत्वपूर्ण ठरला. प्रभाभवानीची नेहा जाधव चमकली. जिजामाता महिला संघाने ओम ज्ञानदीपचा ४५-१७ असा सहज पराभव केला. सुरुवातीपासून आक्रमक खेळ करणाऱ्या जिजामाताने पहिल्या डावात २९-१० अशी भक्कम आघाडी घेत सामन्यावर वर्चश्व राखले होते. दुसऱ्या डावात तोच जोश कायम ठेवत २८गुणांच्या फरकाने सामना आपल्या नावे केला. मयुरी पवार, मिताली गुरव या विजयाच्या शिल्पकार ठरल्या. ओम ज्ञानदीपची रोशनी पाटील बरी खेळली.
साक्षी शेजवळ, जुई नारकर यांच्या चढाई-पकडीच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर विश्वशांतीने महर्षी दयानंद स्पोर्ट्सचा ३२-१८ असा पराभव करीत आपली घोडदौड सुरू ठेवली. पूर्वार्धात २२-०४ अशी मोठी आघाडी विजयी संघाने घेतली होती. उत्तरार्धा महर्षी दयानंदच्या रेशम यादव हिने जोरदार प्रतिकार करीत विश्वशांतीला कडवी लढत दिली. पण ती एकाकी ठरली.

 293 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.