यजमान महाराष्ट्राचे दोन्ही संघ उपांत्य फेरीत

५५ वी पुरुष-महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा- महाराष्ट्राची पुरुषांमध्ये कोल्हापूर विरुध्द तर महिलांमध्ये दिल्ली विरुध्द लढत

उस्मानाबाद : महाराष्ट्राच्या पुरुष व महिला दोन्ही संघानी ५५ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद पुरुष-महिला खो खो स्पर्धेत डावाने विजय मिळवण्याची विजयी परंपरा कायम राखत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत महाराष्ट्राला पुरुषांमध्ये कोल्हापूर विरुध्द तर महिलांमध्ये दिल्ली विरुध्द लढा द्यावा लागणार आहे.
भारतीय खोखो महासंघ व महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांच्या मान्यतेने उस्मानाबाद जिल्हा खोखो असोसिएशनने ही स्पर्धा आयोजित केली आहे. सदर स्पर्धा तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलात सुरू आहेत.
आज झालेल्या पुरुषांच्या उपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्राने ओडिशावर १६-८ असा एक डाव ८ गुणांनी दणदणीत विजय मिळविला. यात महाराष्ट्राचे निहार दुबळे (५ गुण), रामजी कश्यप (१.४० मि. संरक्षण व ४गुण), प्रतिक वाईकर ( २.१० मि. संरक्षण व ३ गुण), लक्ष्मण गवस (१:५० मि. संरक्षण), ऋषिकेश मुर्चावडे ( १:३० मि. संरक्षण) व दिलीप खांडवी (२ मि. संरक्षण) यांनी केलेल्या जोरदार खेळीमुळे महाराष्ट्राला मोठा विजय सहज शक्य करता आला. ओडिशाच्या जगन्नाथ मुर्मू (१ मि. संरक्षण व २ गुण) याची एकाकी खेळी अपुरी पडली.
महिलांच्या उपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्राच्या संघाने केरळचा १०-७ असा एक डाव ३ गुणांनी धुव्वा उडवत पराभव केला. महाराष्ट्राकडून स्नेहल जाधवने ४ गुण मिळविले. अपेक्षा सुतार (३ मि. संरक्षण), अश्विनी शिंदे व रुपाली बडे (प्रत्येकी २.५० मि. संरक्षण), संपदा मोरे (२.१० मि. संरक्षण), रेश्मा राठोड (३.१० मि. संरक्षण), प्रियांका इंगळे व काजल भोर (प्रत्येकी १.४० मि. संरक्षण) यांनी संरक्षणाची भक्कम बाजू सांभाळली. केरळकडून आदित्या (१.४० मि. संरक्षण व १ गुण) व प्रीथी (२ गुण) यांची खेळी अपयशी ठरली.

 215 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.