माध्यमिक शिक्षकांनी मतदारयादीत नाव नोंदणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

कोकण विभाग शिक्षक मतदार यादीत ७ नोव्हेंबरपर्यत करता येणार नोंदणी

ठाणे : विधानपरिषदेच्या कोंकण विभाग शिक्षक मतदारसंघात १ नोव्हेंबर २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम सुरू आहे. मतदारयादीत नाव नोंदणीची अंतिम तारीख ७ नोव्हेंबर आहे. जास्तीत जास्त माध्यमिक शिक्षकांनी मतदार यादीत नाव नोंदणी करण्याचे आवाहन कोंकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आज येथे केले.
भारत निवडणूक आयोगाने विधानपरिषद पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२३ साठी मतदार नोंदणी सुरू केली आहे. यामध्ये जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना मतदार म्हणून नोंदणी करता येणार आहे. त्यानुसार १ ऑक्टोंबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत अर्ज नमुना क्र. १९ भरून मतदार नोंदणी करता येणार आहे. 23 नोव्हेंबर  रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.  २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर या कालावधीत दावे व हरकती स्विकारण्यात येणार आहेत. तर ३० डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
*हे असतील पात्र*
शिक्षक मतदारसंघासाठी मतदार म्हणून जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षक पात्र असून 1 नोव्हेंबर २०२२ या पूर्वी मागील सहा वर्षांपैकी तीन वर्षे माध्यमिक शिक्षक म्हणून काम करणारे, जिल्ह्यात रहिवास असलेले, तसेच मागील तीन वर्षात निवृत्त झालेल्या शिक्षकांना मतदार म्हणून नाव नोंदविता येणार आहे.
*इथे करता येईल नोंदणी*
  ठाणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त माध्यमिक शिक्षकांनी मतदार यादीत नाव नोंदणी करावी, यासाठी प्रशासनाच्यावतीने प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी फक्त उपविभागीय कार्यालयात मतदार नोंदणी करता येत होती. आता जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कार्यालये, तहसीलदार कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालय, कोकण भवनमधील सहायक पुरवठा अधिकारी कार्यालय आदी १४ ठिकाणी मतदार यादीतील नाव नोंदणी अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. तसेच मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या https://ceo.maharashtra.gov.in/Downloads/DownloadForms/Form-19.pdf या संकेतस्थळावरही अर्ज मिळेल. जिल्ह्यातील जास्तीत जास्त माध्यमिक शिक्षकांनी मतदार नोंदणीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शिनगारे यांनी केले आहे.

 37,718 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.