ऋतिक गुप्ता आणि दक्षा नाईक स्पर्धेच्या पाहिल्या दिवसाचे विजेते
धुळे : पुनित बालन प्रस्तुत आणि महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशनच्या वतीने आयोजित ४९ वी राज्यस्तरीय सबज्युनियर्स आणि कॅडेट स्पर्धेचा आजचा पहिला दिवस ओम पाटील, कोल्हापूर, ऋतिक गुप्ता, मुंबई आणि सांगलीच्या दक्षा नाईक यांनी गाजविला.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या ५० किलोखालील गटात पुण्याच्या शौर्य बिचुकले याने चपळाईने पाहिल्याच मिनिटात सीओईनागे या डावाचा वापर करून अर्धा गुण घेतला आणि सामन्यावर पकड घेतली पण लगेचच कोल्हापूरच्या ओमने आक्रमक खेळी करून अर्धा गुण घेतला, दोघांचे समान गुण झाले आणि सामन्याची चुरस वाढली. स्पर्धेचा तीन मिनिटांचा वेळ संपल्यामुळे सामना गोल्डन स्कोअरवर गेला आणि स्पर्धकांना वाढीव वेळ मिळाला. साधारणपणे नवव्या मिनिटावेळी ओम पाटील यांनी हराई गोषी या डावाचा सुरेख वापर केला आणि इप्पोन हा पूर्ण गुण मिळवून सुवर्णपदक जिंकले. दुसऱ्या ५५ किलोखालील वजनीगटाच्या सामन्यात मुंबईच्या ऋतिक गुप्ताने नाशिकच्या वेदांत अहिरेला ओउची माकेकोमी डावाचा सफाईदार वापर करून पूर्ण इप्पोन गुणाने पराभूत केले आणि सुवर्णपदक जिंकले. ४८ किलोखालील सबज्युनियर्स मुलींचा अंतिम सामन्यात सांगलीच्या दक्षा नाईकने यवतमाळच्या श्रावणी डिकेला ओगोषी डाव मारला आणि विजेतेपद मिळवले. हा देखील सामना अत्यंत चुरशीचा झाला आणि गोल्डन स्कोअरवर गेलेल्या लढतीला दक्षाने पूर्णविराम दिला. स्पर्धेसाठी स्पोर्ट्स अथोरिटी ऑफ इंडियाचे प्रशिक्षक आणि राष्ट्रीय पंच सुशीलकुमार गायकवाड यांची स्पर्धा संचालकपदी तर मॅट चेअरमन म्हणून अतुल बामनोदकर, निखिल सुवर्ण आणि सचिन देवळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान स्पर्धेचा औपचारिक प्रारंभ संघटनेचे महासचिव शैलेश टिळक, रवी पाटील, धुळे संघटनेचे अध्यक्ष किरण बागुल आदी मान्यवरांच्या हस्ते मॅट आणि ज्यूदोची आद्य दैवते खाणीवले , जिगोरो कानो यांसह भगवान श्रीहनुमानाजींच्या प्रतिमा पूजनाने झाला. धुळे जिल्हा ज्यूदो अमॅच्युअर असोसिएशन यांच्या सहकार्याने आयोजिलेल्या या स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल येथे ६ नोव्हेंबर पर्यंत चालणार आहेत. २७ जिल्ह्यातील ५०५ खेळाडू ४० पंच आणि ७० प्रशिक्षक तसेच व्यवस्थापक धुळे शहरात दाखल झाले आहेत. उद्या या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ होईल.
आजचे निकाल– सबज्यनियर्स गट-मुले
५० किलोखालील
सुवर्णपदक- ओम पाटील कोल्हापूर
रौप्यपदक- शौर्य बिचुकले पिडीजेए
कांस्यपदक-आयुष शेलार, मुंबई आणि अजित व्यवहारे, पीजेए
५५ किलोखालील मुले
सुवर्णपदक- ऋतिक गुप्ता, मुंबई
रौप्यपदक- वेदांत अहिरे, नाशिक
कांस्यपदक- दर्शन गावले क्रीडा प्रबोधिनी आणि प्रथमेश बनकर पीजेए
सबज्यनियर्स गट -मुली
४८ किलोखालील
सुवर्णपदक-दक्षा नाईक, सांगली
रौप्यपदक- श्रावणी डिके, यवतमाळ
कांस्यपदक- रुपाली भोये, नाशिक आणि जनिशा व्होरा, मुंबई
370 total views, 1 views today