दहावी संतोष कुमार घोष १६ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा – दिलीप वेंगसरकर अकादमीचा ३ बाद ४५६ असा धावांचा डोंगर
मुंबई : रोहन करंदीकरच्या (नाबाद २००) आणि हर्ष आघाव (नाबाद १७६) यांनी तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या ३४८ धावांच्या भागीदारीमुळे दिलीप वेंगसरकर अकादमीने पय्याडे स्पोर्ट्स क्लबविरुद्ध ३ बाद ४५६ धावांचा डोंगर रचला. दहाव्या संतोषकुमार घोष क्रिकेट स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीतल्या एका अन्य सामन्यात गे कॅव्हेलियर्सच्या डावखुऱ्या फिरकी गोलंदाज कार्तिकेय शर्मा याने स्पोर्ट्सफील्ड क्रिकेट क्लबविरुद्ध ५१ धावात ६ बळी घेत आपली छाप पाडली. ही स्पर्धा स्पोर्टिंग युनियन आणि कल्याणदास मेमोरियल फाउंडेशनने आयोजित केली आहे. मुंबई क्रिकेटचे आजी माजी सचिव अजिंक्य नाईक आणि संजीव नाईक यांचे स्पर्धेला सहाय्य लाभले आहे.
दिलीप वेंगसरकर अकादमीचा नाणेफेकीनंतर फलंदाजी करण्याचा निर्णय एकदम अचूक ठरला. रोहन आणि हर्ष हे संघाची २बाद ५१ अशी स्थिती असताना एकत्र आल्यावर त्यानंतर त्यांनी प्रतिस्पर्धी संघाला अक्षरशः पळता भुई थोडी केली. रोहनने १८७ चेंडू ३२ चौकारांच्या सहाय्याने आपले द्विशतक पूर्ण केले. त्यामानाने हर्षची खेळी म्हणजे समोरच्या गोलंदाजांचा संहार अशी होती. केवळ १३२ चेंडूंमध्ये त्याने १७ चौकार आणि पाच षटकार लगावत आपली १७६ धावांची साकारली. त्यात पय्याडे संघाने संथ गोलंदाजी केल्याने त्यांना ४० धावांची पेनल्टी पंचांनी दिली.
एका अन्य सामन्यात स्पोर्ट्सफील्डला ४५ षटकात १३७ मध्ये गुंडाळणाऱ्या गे कॅव्हेलियर्सची अवस्था फारच खराब झाली. त्यांचा डाव २६ षटकांमध्ये अवघ्या ७६ धावात कोलमडला. कॅव्हेलियर्सच्या कार्तिकेयने ५१ धावांत ६ अशी टीच्चून गोलंदाजी केली. ऑफस्पिनर मन भानुषाली याने ३५ धावा तीन बळी टिपले. दुसऱ्या डावात एक बाद २७ धावा केल्या असून ही लढत निर्णायक होण्याची शक्यता दिसू लागली आहे.
शांतीबाई मेमोरियलच्या ४४.२ षटकात १५९ धावांना मुंबई पोलीस जिमखान्याने ३८.२ षटकात ४ बाद ७७ असा जबाब दिवसअखेर दिला असून पहिल्या डावातील आघाडीसाठी उद्या दोघांमध्ये चढाओढ पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
310 total views, 2 views today