ऑक्टोबर महिन्याचे वेतन तसेच सानुग्रह अनुदान ठामपा कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते आदेश ; कर्मचाऱ्यांनी मानले आभार
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे, ठाणे महानगरपालिकेने १८ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान तसेच ऑक्टोबरचे वेतन १९ ऑक्टोबर रोजीच  कर्मचाऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केले. सर्व प्रकारच्या १००१३ कर्मचाऱ्यांना सुमारे ७२ कोटी रुपये वितरित करण्यात आल्याचे ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले. ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीचा सण उत्साहात साजरा करता यावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आदेश दिले होते. तसेच ,ठाणे महापालिकेने कर्मचाऱ्यांना १८ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याबाबत कर्मचाऱ्यांच्या वतीने मध्यस्थीही केली होती. त्यानुसार, कायम तसेच कंत्राटी कर्मचारी यांना देय असलेल्या रक्कमा त्यांच्या बॅंक खात्यात जमा झाल्याचे आयुक्त अभिजीत बांगर नमूद केले. ठाणे महानगरपालिकेचे एकूण ६ हजार ४२२ व शिक्षण विभागाचे ७६३ कायम कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी एकूण ४८ कोटी २३ लाख इतकी रक्कम कर्मचाऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात आली. तर, सानुग्रह अनुदानापोटी एकूण १३ कोटी १३ लाख इतक्या रकमेचे वाटप करण्यात आले आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन देखील अदा करण्यात आलेआहे.  ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागात रस्ते सफाईसाठी १२९६ इतके कंत्राटी कामगार असून त्यांना देखील देय असलेल्या रकमेनुसार सानुग्रह अनुदानाचे वितरण करण्यात आले. त्यापोटी २ कोटी ६३ लाख इतकी रक्कमअदा करण्यात आली.
ठाणे परिवहन उपक्रमातंर्गत एकूण १५३२ कायम कर्मचारी असून ऑक्टोबर महिन्याच्या वेतनापोटी एकूण ७ कोटी ५६ लाख इतकी रक्कम तर सानुग्रह अनुदानापोटी एकूण २ कोटी ६२लाख इतकी रक्कम महापालिकेकडून अदा करण्यात आल्याची माहिती मुख्य लेखा व वित्तअधिकारी दिलीप सूर्यवंशी यांनी दिली. ऑक्टोबर महिन्याचे वेतन तसेच सानुग्रह अनुदान जमा झाल्याने ठामपा कर्मचारी आनंदी असून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे आभार मानले आहेत.

 18,995 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.