फाइव्ह ए साईड – रिंक फुटबॉल स्पर्धा
मुंबई : गतविजेता सेंट जोसेफ्स अ, मीरा रोड संघाने वेलिंग्टन कॅथलिक जिमखाना आयोजित इंटर-पॅरिश फाइव्ह-ए-साईड रिंक फुटबॉल जेतेपद कायम राखले. अंतिम फेरीत सोमवारी त्यांनी सेंट जोसेफ्स ब, जुहू संघावर ३-२ अशी मात केली.
विलिंग्टन जिमखान्याच्या टेनिस कोर्टवर रंगलेल्या स्पर्धेत पुरुष खुल्या गटाच्या अंतिम फेरीत चांगलीच चुरस पाहायला मिळाली. मात्र, सेंट जोसेफ्स अ, मीरा रोड संघाने वर्चस्व राखले. श्रावण शेट्टी, आरोन डिकॉस्टा आणि दीपक पाल यांनी प्रत्येकी एक गोल करताना विजयात मोलाचा वाटा उचलला. प्रतिस्पर्धी संघाकडून ड्वाइट डीअॅब्रिओ आणि महेश कोटकर यांनी प्रत्येकी एक गोल करताना सामन्यात रंगत आणली.
मीरा रोड संघाने आक्रमक सुरुवात करताना सातत्यही राखले. ३-० अशा मोठ्या आघाडीनंतर ते एकतर्फी जिंकणार, असे वाटत असतानाच जुहू संघाने गियर बदलला. त्यांच्या दोन गोलमुळे चुरस वाढली. मात्र, शेवटच्या काही मिनिटांमध्ये मीरा रोड संघाने सुरेख बचाव करताना जेतेपदावर नाव कोरले.
वेलिंग्टन कॅथलिक जिमखान्याचे चेअरमन रॉवलिन पिंटो आणि त्यांची पत्नी मिसेस पिंटो यांच्या प्रमुख उपस्थितीत मीरा रोड संघाला ७० हजार रुपयांचा धनादेश आणि विजेत्या संघासाठीची ट्रॉफी प्रदान करण्यात आली. जुहू संघाला ४० हजार रुपयांचा धनादेश आणि उपविजेता संघासाठीची ट्रॉफी मिळाली.
निकाल – पुरुष खुला गट अंतिम फेरी – सेंट जोसेफ्स अ, मीरा रोड ३(श्रावण शेट्टी, आरोन डिकॉस्टा, दीपक पाल) विजयी विरुद्ध सेंट जोसेफ्स ब, जुहू २ (ड्वाइट डीअॅब्रिओ, महेश कोटकर).
299 total views, 1 views today