महिला, तरुणींच्या सुरक्षेसाठी आजपासूनच कृती आराखडा तयार करा

पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी पोलीस आयुक्तालयात महिला सुरक्षेचा आढावा घेत दिले निर्देश

ठाणे : ठाण्यात काल एका रिक्षा चालकाने तरुणीचा विनयभंग केल्याची दुर्दैवी घटना घडली. अशी घटना घडू नये, महिला, तरुणींना सुरक्षित वाटावे यासाठी आजपासूनच कृती आराखडा (अँक्शन प्लॅन) तयार करण्याची सूचना पोलिसांना दिले असल्याची माहिती ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज येथे दिली.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात महिला सुरक्षेसंदर्भात बैठक घेतली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेस संबोधित केले. यावेळी पोलीस आयुक्त जयजित सिंह, सह आयुक्त दत्तात्रय कराळे, अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) सुरेश जाधव, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री देसाई म्हणाले की, काल घडलेल्या घटनेची माहिती कळाल्यानंतर तातडीने पोलीस आयुक्तांशी बोलून कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. संबंधित तरुणींने तक्रार दाखल केल्यानंतर दोन तीन टीम बनवून आरोपीचा शोध घेतला आणि रात्री त्यास अटक करण्यात आली. असे प्रकार घडू नयेत, यासाठी आज पोलीस दलाबरोबर बैठक घेऊन आज चर्चा केली. अशा घटना रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालये व खासगी क्लाससेच्या परिसरात साध्या वेशातील महिलांची नेमणूक करणे तसेच बीट मार्शलच्या गस्तीचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना यावेळी पोलीसांना देण्यात आल्या आहेत. महाविद्यालयातीन युवतींसोबत अशा प्रकारच्या घटना वारंवार करणाऱ्यांना प्रतिबंधासाठी विशेष गस्त वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
साताऱ्यात महिला सुरक्षा पथकाची पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आला होता. अशाच प्रकारचा प्रकल्प राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. पोलीस दलास मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. त्यासाठी या वर्षी सुमारे पंधरा हजार पोलीस शिपाई भरती करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पोलीस आयुक्तालयास दुचाकी व चारचाकी वाहने व इतर संसाधनासाठी पोलीस आयुक्तांना प्रस्ताव पाठविण्यास सांगितले आहे. गरज पडल्यास जिल्हा वार्षिक नियोजन निधीतून यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही देसाई यांनी सांगितले.
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षाचा ११२ या क्रमांकावरील प्रतिसादाचा वेळ हा राज्यात सर्वात अधिक आहे. नियंत्रण कक्षाला कॉल आल्यानंतर पाच मिनिटांच्या आत पोलीस जागेवर पोचतात. मात्र, कालच्या सारखा दुर्देवी प्रकार घडू नये, यासाठी व महिला, तरुणींना सुरक्षितता वाटण्यासाठी कडक उपाय योजना करण्यासाठी सूचना पोलीसांना देण्यात आल्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ठाण्यातील रिक्षा चालक भाडे नाकारत असल्याची व जादा प्रवासी वाहतूक करत असल्याच्या प्रश्नांवर पोलीस दल व परिवहन विभागाची समन्वयाने कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.

 17,785 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.