एकलव्य विद्यार्थ्यांसाठी वारली चित्रकलेच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

समता विचार प्रसारक संस्थेतर्फे ठाण्यात एकलव्य विद्यार्थ्यांसाठी वारली चित्रकलेचे प्रशिक्षणशिबीर आयोजित करण्यात आले होते. वारली चित्रकलेत प्रविण असलेल्या कलाकार शहनाज शेख आणि येऊर येथील आदिवासी समाजातील एकलव्य विद्यार्थी करीना साऊद यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर पार पडलं. या वेळी प्रमुख पाहुणे असलेले राष्ट्रीय मलखांब सुवर्ण पदक विजेते आणि येऊर येथील आदिवासी समाजाचे माजी एकलव्य विद्यार्थी किशोर म्हात्रे आपले मनोगत मांडताना म्हणाले एकलव्य पुरस्कार म्हणजे हातात आलेली धगधगती मशाल आहे. ही मशाल घेऊन तुम्हाला तुमच्या प्रतिकूल परिस्थितीशी लढत पुढे जायचे आहे. समता विचार प्रसारक संस्थेच्या एकलव्य पुरस्काराने माझ्या आत्मविश्वासात वाढ झाल्याचे नम्रतेने नमूद करून ते पुढे म्हणाले की यशस्वी झाल्यावर मात्र आपल्या लढतीत आपल्याला मदत करणार्‍यांची जाण ठेऊन आपणही गरिबीच्या प्रतिकूलतेत लढणार्‍या विद्यार्थ्यांना सढळ हस्ते मदत करून समाजाचे ऋण फेडले पाहिजे. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष मीनल उत्तुरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्व एकलव्य प्रशिक्षणार्थींचे कौतुक करून सांगितले की अशा प्रकारच्या शिबिरांनी मुलांच्या कलागुणांना अवकाश प्राप्त होतो. संस्थेतर्फे आयोजित करत असलेल्या समता संस्कार शिबीर, नाट्यजल्लोष, क्रिडास्पर्धा आणि चित्रकला, रांगोळी अशा सारख्या विविध कलांच्या शिबिरात सहभाग घेतल्याने मुलांच्या व्यक्तिमत्व विकासात हातभार लागतो. अभ्यासासह अशा प्रकारच्या कालगुणांना वाव देण्याचा संस्था नेहमीच प्रयत्न करते. शहनाज शेख यांनी आदिवासींच्या जंगलातील राहणीमानाची माहिती दिली.

संस्थेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये आयोजित केलेल्या या शिबिरात ७० एकलव्यांनी सहभाग घेतला. ठाण्यातील मानपाडा, माजिवडा, कळवा, कोपरी, सावरकर नगर अशा वेगवेगळ्या विभागातून आलेल्या विद्यार्थ्यांना शहनाज शेख आणि करीना साऊद यांनी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात मार्गदर्शन केले. त्यांना संस्थेतर्फे चित्रकलेचे सर्व साहित्य पुरवण्यात आले. संस्थेचे एकलव्य कार्यकर्ते अक्षता दंडवते, प्रसन्न काळे यांनी संयोजनाची जबाबदारी मेहनतीने चोख पार पाडली. त्यांना स्मिता मोरे, इनोक कोलियार, राहुल माने, प्रतिक्षा तायडे आदि एकलव्य कार्यकर्त्यांची मोलाची साथ लाभली. संस्थेचे सचिव अजय भोसले यांनी आदिवासी जीवनाची आणि त्यांच्या विविध वाद्द्यांची आणि कलेची माहिती मुलांना सांगितली. संस्थेचे अध्यक्ष हर्षलता कदम, उपाध्यक्ष सुनील दिवेकर, जेष्ठ कार्यकर्ते जगदीश खैरालिया यांनी उपस्थित राहून मुलांना प्रोत्साहन दिले.

 191 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.