कोपरी पुलाच्या संथ कामाचा विचारे यानी घेतला समाचार

ठाणे : पूर्व द्रुतगती महामार्गावर सकाळी व संध्याकाळी कोपरी रेल्वे पुलाच्या अरुंद मार्गिका असल्याने वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचा खोळांबा होतो. तो टाळण्यासाठी या पूलाचे रुंदीकरणाचे काम एम एम आर डी ए व रेल्वे मार्फत सुरू आहे. या कामाची शनिवारी खासदार राजन विचारे यांनी रेल्वे ठाणे महापालिका आणि एम एम आर डी एच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर पाहणी केली. यावेळी संथ गतीने सुरु असलेल्या कामाबाबत खासदार विचारे यांनी नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांची कानउघडणी केली.
कोपरी रेल्वे पुलाच्या पहिल्या टप्प्यातील चार मार्गिका तयार होऊन . ९ ऑक्टोंबर २०२१ रोजी याचा लोकार्पण सोहळा संपन्न होऊन नागरिकांसाठी खुला केला. परंतु दुसऱ्या टप्प्यातील ४ मार्गिका सुरू करण्यासाठी जुना रेल्वे पुल तोडण्याचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे.याची पाहणी शनिवारी खासदार राजन विचारे यांनी केली. यावेळी त्यांनी रेल्वे पुलाच्या दोन्ही बाजूस भराव भरण्याचे काम तत्काळ सुरु करा असे उपस्थित अधिकाऱ्यांना बजावले. काही दिवसापूर्वी या पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे विनीत भालेराव या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या संदर्भात दोषींवर कारवाई का करण्यात आली नाही असा सवाल कोपरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसोजा यांना विचारला. हि बाब अतिशय गंभीर असून या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबीयास कोणत्याही मदतीचा हात प्रशासनाकडून न मिळाल्याची खंत खा. विचारे यांनी व्यक्त केली आहे. या व्यक्तीच्या कुटुंबियांस नोकरी किंवा आर्थिक मदत करावी अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी केली आहे.
या पुलावरील खड्ड्यांमध्ये पेवर ब्लॉक न बसविता उत्कृष्ठ दर्जाचे मॅस्टिक पद्धतीने खड्डे २ दिवसात बुजविण्याचे आदेश रेल्वे व एम एम आर डी ए च्या प्रशासनाला विचारे यांनी दिले . दरम्यान या पुलाचे काम ३१ जानेवारी २०२३ पर्यंत पूर्ण करून देण्याचे आश्वासन रेल्वे व एम एम आर डी ए च्या प्रशासनाकडून देण्यात आले. या पाहणी दोऱ्यात रेल्वेचे मुख्य प्रकल्प अभियंता लक्ष्मण लोलगे, एम एम आर डी ए चे प्रकल्प अभियंता सुर्वे, ठाणे महानगरपालिकेचे अभियंता धनंजय मोदे, सहाय्यक पोलीस आयुक्त वेर्णेकर, तसेच शहर वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक खेडेकर, कोपरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डिसोजा, माजी नगरसेवक मधुकर देशमुख, उपस्थित होते.

 6,245 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.