लम्पी त्वचारोगाचा फैलाव रोखण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील सर्व गुरांचा बाजार व शर्यती बंद पशुसंवर्धन विभागाची माहिती

ठाणे : ठाणे जिल्ह्यात जनावरांवर लम्पी त्वचा रोगामुळे आजपर्यंत २६ जनावरे बाधित आढळली आहेत. या आजाराचा फैलाव होऊ नये यासाठी जिल्ह्यातील सर्व बाजार समितीमध्ये गुरांचा बाजार बंद करण्यात आला असून जनावरांच्या शर्यती व प्रदर्शन बंद करण्यात आले आहेत, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी, अंबरनाथ या तीन तालुक्यांमध्ये लंपी रोगाचे १२ केंद्र बिंदू असून एकूण २६ जनावरे बाधित आढळून आलेली आहेत. लंपी त्वचा रोगाचे संक्रमण होऊ नये याकरिता जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त जिल्हा ठाणे आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्याकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत असून यामध्ये बाधित भागातील ५ किलोमीटर परिघातील परिसरात लसीकरण करण्यात येत आहे.

जिल्ह्यात ५ शीघ्र कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. बाधित क्षेत्रातील ५ किलोमीटर परिघातील परिक्षेत्रात एकूण ७०७६ जनावरे आहेत. या क्षेत्रातील ७००९ जनावरांना लसीकरण करण्यात आलेले आहे उर्वरित सर्व जनावरांचे लसीकरण करण्याचे काम सुरू आहे. संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या परिसरात सर्व रोग नमुने, बाधित जनावरांना उपचार, रोग प्रतिबंधक लसीकरण याकरिता कोणत्याही प्रकारचे सेवाशुल्क आकारण्यात येत नसून सर्व सेवा मोफत देण्यात येत आहेत. याबाबत जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकांना सूचित करण्यात आलेले आहे. ठाणे जिल्ह्यात लम्पी त्वचा रोगामुळे नागरिकांनी भयभीत होण्याची गरज नाही. हा आजार जनावरांपासून माणसांना होण्याची शक्यता अजिबात नसून, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या सेवनाने मनुष्यांना कोणत्याही प्रकारचा संसर्ग होत नाही, असे विभागाने कळविले आहे.
विभागाकडे आवश्यक सर्व औषधे व लस साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून सर्व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी सतर्क आहेत. लम्पी सदृश्य लक्षणे असलेले जनावर निदर्शनास आल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा अथवा १९६२ या Helpline वर कॉल करावा. या आजाराबाबत पशुपालक व नागरिकांनी कोणतीही भीती व शंका बाळगण्याची गरज नाही, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.

 898 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.