मंत्रालयातील १०३ अधिकाऱ्यांच्या बदल्या – ठाकरे सरकारचा दणका

अधिकाऱ्यांनी जर बदली रद्द करणे, शिफारस करणे, दबावासाठी पत्र जोडल्यास त्यांची ही कृती गैरवर्तणूक समजली जाईल

मुंबई –  फोन टॅप प्रकरणातील गोपनिय माहिती विरोधी पक्षाच्या हाती लागल्यामुळे महाविकास आघाडी सरकारने अधिकाऱ्यांच्या बदल्याचा धडका लावला आहे. मंत्रालयातील तब्बल १०३ सहाय्यक कक्ष अधिकाऱ्यांच्या बदल्या करून सरकारी अधिकाऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे. तसंच, या आदेशाविरोधात भूमिका घेतल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

मुंबई पोलीस दल आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचं सत्र सुरूच आहे. आता राज्याचा गाडा ज्या मंत्रालयातून हाकला जातोय तेथील अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. मंत्रालयामध्ये एकाच वेळी १०३ सहायक कक्ष अधिकारी यांच्या बदल्या करण्याचा आदेश काढण्यात आला आहे.  एकाच संयुक्त आदेशाने बदल्यांची ऑर्डर काढण्यात आली आहे.  या आदेशामुळे अधिकारी वर्गामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. गृह, सामान्य प्रशासन, उद्योग, शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना या आदेशामुळे मोठा धक्का मानला जात आहे.

विशेष म्हणजे, हे आदेश कार्यमुक्तीचे आदेश असून त्याबद्दल संबंधित विभागाला दुसरे आदेश काढण्याची आवश्यकता नाही. सदरील कर्मचाऱ्यांना २ ऑगस्ट २०२१ रोजी बदलीच्या ठिकाणी रुजू व्हावे लागणार आहे. जर अधिकारी रूजू झाल्याचे दिसून आले नाही तर त्यांच्याविरोधात शासन निर्णय २३ डिसेंबर २०१६ शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल. बदली झालेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी जर बदली रद्द करणे, शिफारस करणे, दबावासाठी पत्र जोडल्यास त्यांची ही कृती गैरवर्तणूक समजली जाईल आणि त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराच देण्यात आला आहे.

तसंच, आहरण व संवितरण अधिकारी, अधिदान व लेखाधिकारी यांचा कळविण्यात येते की, उपरोक्त कर्मचाऱ्यांचे २ ऑगस्ट २०२१ पासूनचे वेतन कोणत्याही परिस्थितीत पूर्वीच्या विधातून अदा करण्यात येऊ नये अन्यथा त्यांना व्यक्तीश: जबाबदार धरण्यात येईल, अशी कडक सूचनाही देण्यात आली आहे.

ज्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची बदली झाले आहे, तिथे रुजू  झाल्यावर तातडीने माहिती सामन्य प्रशासन विभागाला त्वरीत सादर करावी लागणार आहे.

 379 total views,  3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *