पंचायत समिती आणि जिल्हा परिषद विकास आराखडा तयार होणार

जिल्हा परिषद सदस्यांना विकास आराखडा तयार करण्याचे प्रशिक्षण

ठाणे – मागील काही वर्षांपासून गाव गावाचा विकास आराखडा तयार करण्यासाठी  गावकऱ्यांचा सहभाग घेतला जात आहे.याच पार्श्वभूमीवर आता पंचायत समिती विकास आराखडा व जिल्हा परिषद विकास आराखडा (BPDP/DPDP) तयार करण्यात येणार आहे. हा आराखडा तयार करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्यांची महत्वपूर्ण भूमिका असल्याने आज सर्व जिल्हा परिषद सदस्यांना प्रशिक्षण  देण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील नियोजन भवन सभागृहात संपन्न झालेल्या या  प्रशिक्षण कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे, उपाध्यक्ष सुभाष पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, आरोग्य व बांधकाम समिती सभापती वंदना भांडे, कृषि, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती सभापती संजय निमसे, महिला व बाल कल्याण समिती सभापती श्रेया गायकर, समाजकल्याण समिती सभापती प्रकाश तेलीवरे, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, मुख्य लेखा व वित्तधिकारी मयुर हिंगाने ,उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अजिंक्य पवार तसेच सर्व सन्मानीय सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रामपंचायत) चंद्रकांत पवार यांनी केले. तर यशदा प्रशिक्षण संस्थेचे प्रवीण प्रशिक्षक वायगणकर, मीनल बाणे यांनी आराखडा तयार कसा करावा याबाबतचे जिल्हा परिषदेच्या सदस्यांना प्रशिक्षण दिले.

यावेळी प्रशिक्षकांनी आराखडे तयार करण्यासाठी जिल्हास्तरीय नियोजन समिती आणि क्षेत्रीय कार्यकारी गटाची स्थापना करणे, वातावरण निर्मीती करणे, कार्यकारी गटाचे प्रशिक्षणे, पंचायत विकास आराखड्याचे एकत्रिकरण आणि विकासात्मक गरजांचे प्राधान्यक्रम निश्चिती, परिस्थिती विश्लेषण आणि विकास स्थितीबाबतचा अहवाल (DSR), विकासात्मक दृष्टीकोन कृती कार्यक्रम, नियोजन करण्यासाठी संसाधने, नियोजनाची महत्वाकांक्षी क्षेत्रे, विशेष पंचायत स्तरीय सभा आणि कार्यान्वयीन विभागांचा सहभाग, क्षेत्रीय विभागाच्या योजना आणि कार्यक्रमाचे अभिसरण, प्रकल्प विकास, आराखडा निर्मिती व पंचायत विकास आराखड्यास मंजुरी, आराखडा अंमलबजावणी, देखरेख प्रणाली, अनुभवाधारित बदल करणे व पंचायत समिती विकास आराखड्यामध्ये बदल याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे.

 291 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.