ठाणे – दिव्यातील सिद्धांत पार्क, वक्रतुंड सोसायटीमधील मार्लेश्वर पतपेढीच्या कार्यालयाचा स्लॅब पडल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. या घटनेत तेथे काम करणाऱ्या दोन महिला कर्मचारी जखमी झाल्या असून त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले आहे. दिवा साबे रोड येथे वक्रतुंड सोसायटी ही तळ आणि एक मजली असून तेथे रूम नंबर ६ येथे मार्लेश्वर पतपेढीचे कार्यालय आहे. नेहमीप्रमाणे कार्यालय सुरू झाले. याचदरम्यान अचानक त्या रूमचा स्लॅब पडला. यावेळी तेथे काम करत असलेल्या अर्पिता साटम (३५) आणि सिद्धी पडावेकर (३५) या दोघी जखमी झाल्या आहेत. यामध्ये अर्पिता यांच्या डोक्याला,हात-पाय आणि पाठीला दुखापत झाली असून त्यांना मुंब्र्यातील काळसेकर रुग्णालयात दाखल केले आहे. तर सिद्धी यांच्या हातापायाला दुखापत झाली असून त्यांना दिव्यातील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन विभागासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच या सोसायटीचा तळ मजला हा निवासी वापरासाठी असून पहिल्या मजल्यावर नोंदणीकृत कार्यालय आहे. ते कार्यालय हे पतपेढीचे असून त्याचे मालक हे नंदकिशोर घोणे असल्याची माहीती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
403 total views, 2 views today