दिवा डंपिंग ग्राऊंडबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात – महापौर नरेश म्हस्के

डंपिंग ग्राऊंडची समस्या सोडविण्यासाठी कमिटीची स्थापना

ठाणे –  दिवा डंपिंग ग्राऊंड पासून दिवावासियांची सुटका करण्यासाठी महापालिका हद्दीबाहेर असलेले भूखंड भाडेतत्वावर डंपिंगसाठी ताब्यात घेण्यात यावे, तसेच सद्यस्थ‍ितीत दिवा येथील डंपिंग ग्राऊंड येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्याचे मातीच्या भरावाने सपाटीकरण करुन दुर्गंधी पसरु नये या दृष्टीकोनातून ठोस उपाययोजना तातडीने करण्याचे आदेश प्रशासनाला देत लवकरच दिवावासियांची  डंपिंग ग्राऊंड मधून सुटका होईल असा विश्वास महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी आज झालेल्या बैठकीत व्यक्त केला.

दिवा येथील डंपिंग ग्राऊंडबाबत नागरिकांच्या वारंवार तक्रारी येत आहेत, डंपिंग ग्राऊंडमुळे उद्भवणाऱ्या विविध समस्या व नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेवून त्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने आज महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीस उपमहापौर पल्लवी कदम, सभागृह नेते अशोक वैती, स्थायी समिती सभापती संजय भोईर, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला, दिवा प्रभाग समिती अध्यक्षा सुनिता मुंडे, माजी उपमहापौर नगरसेवक रमाकांत मढवी,शैलेश पाटील, नगरसेविका दर्शना म्हात्रे, अंकिता पाटील, दिपाली भगत, अमर पाटील, दिपक जाधव, अतिरिक्त आयुक्त 2 संजय हेरवाडे, उपायुक्त अशोक बुरपल्ले, मनिष जोशी, सहाय्यक संचालक नगररचना सतीश उगिले, आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी हळदेकर, उपनगर अभियंता नितीन येसुगडे, शहर नियोजन अधिकारी शैलेश बेंडाळे आदी उपस्थित होते.  

 या बैठकीत दिवा येथील डंपिंग ग्राऊंडसंदर्भात नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत चर्चा करण्यात आली. या डंपिंग ग्राऊंडची प्रशासनाने प्रत्यक्ष जागेवर जावून पाहणी करुन त्या ठिकाणी असलेल्या कचऱ्याच्या ढिगांचे सपाटीकरण करुन त्यावर मातीचा भराव टाकून दुर्गंधी येणार नाही या दृष्टीने उपाययोजना कराव्यात. तसेच ठाणे महापालिकेच्या हद्दीबाहेर असलेल्या मोकळया भूखंडांची माहिती घेवून हे भूखंड भाडेतत्वावर घेवून तेथे डंपिंग करण्यात यावे असेही महापौर नरेश म्हस्के यांनी यावेळी नमूद केले.

तसेच ठाणे  महापालिका हद्दीत ज्या ठिकाणी डंपिंग ग्राऊंडचे आरक्षण आहे, त्या जागेवर अतिक्रमणे झाली असल्यास त्यावर ताबडतोब कारवाई करुन त्या जागा ताब्यात घेण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याबाबतचा निर्णय देखील यावेळी  घेण्यात आला.

तसेच महापालिकेच्या कायमस्वरुपी डंपिंग ग्राऊंडसाठी जागा निश्चित करण्यासाठी नगरसेवक व अधिकारी यांची एक कमिटी स्थापन करण्यात यावी व कमिटीने डंपिंग ग्राऊंड संदर्भात अभ्यास करुन त्याबाबत वेळोवळी महापौर व आयुक्त यांचेशी चर्चा करावी असे या बैठकीत ठरविण्यात आले. ठाणे महापालिका हद्दितील डंपिंगग्राऊंड इतरत्र हलविणेबाबत सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा व्यक्त करत डंपिंग ग्राऊंडमधून लवकरच दिवावासियांची सुटका होईल असा विश्वास महापौर नरेश म्हस्के यांनी व्यकत केला. तसेच या संदर्भात स्थापन केलेल्या कमिटीने पाहणी केल्यानंतर लवकरच बैठक घेवून निर्णय घेण्यात येईल असेही महापौरांनी नमूद केले.

 418 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.