बाजूच्या सहा इमारतीमधील १७४ कुटुंबाना केले इतरत्र स्थलांतरीत
ठाणे – ठाण्यात मागील २४ तासात झालेल्या पावसामुळे जीनजीवन विस्कळीत झाले आहे. असे असतांना पहाटे ५ च्या सुमारास वागळे इस्टेट भागातील डिसोझा वाडी येथील तळ अधिक चार मजल्याच्या रिकामी असलेल्या इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. त्यानंतर या इमारतीच्या आजूबाजूल्या असलेल्या सहा इमारती रिकामी करण्यात आल्या असून येथील तब्बल १७४ कुटुंबांना बाजूच्या शाळेत स्थलांतरीत करण्यात आले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, ३० वर्षे जूनी इमारत असल्याने ती इमारत कशी पडायची असा पेच पालिकेपुढे उभा ठाकला आहे.
ठाण्यात मागील २४ तासात १८७.४१ मीमी पावासाची नोंद झाली आहे. गुरुवार पासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अशातच शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास वागळे इस्टेट भागातील डिसोझा वाडी येथील तळ अधिक चार मजल्याची ३० वर्षे जुनी असलेल्या शिवभुवन या इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. सलग दोन वेळा आवाज झाल्याने आजूबाजूच्या रहिवाशांनी या संदर्भात तत्काळ ठाणो महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला घटनेची माहिती दिली. त्यानंतर घटनेचे गांर्भीय लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन विभागासह अग्निशमन विभागाचे पथक आणि अतिक्रमण विभागाचे पथक घटनास्थळ दाखल झाले. या इमारतीच्या आजूबाजूला अगदी चिकटून चिकटून इमारती उभ्या आहेत. त्यामुळे ही इमारत पडली तर आजूबाजूच्या इमारतींना देखील धोका संभवू शकतो. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने येथील आजूबाजूच्या सहा इमारती तत्काळ रिकाम्या करण्यास सुरवात केली. त्यानुसार येथील अष्टमी निवास तळ अधिक चार मजल्याची इमारत (६४ कुटुंब), पाडुरंग सदन तळ अधिक चार (२४ कुटुंब), श्रीराम निवास तळ अधिक चार (१८ कुटुंब), श्रीगणोश निवास तळ अधिक चार (२१ कुटुंब), पांडे दुर्गा निवास तळ अधिक चार (२९ कुटुंब) आणि राम निवास तळ अधिक चार (१८ कुटुंब) अशा एकूण १७४ कुटुंबांना तत्काळ बाजूच्या महापालिकेच्या शाळेत स्थलांतरीत करण्यात आले आहे.
430 total views, 1 views today