18 ते 44 या वयोगटातील नागरिकांना मिळणार कोवॅक्स‍िनचा दुसरा डोस

महापौर नरेश म्हस्के यांच्या निर्देशाची प्रशासनाने घेतली दखल

ठाणे – मागील महिन्यात काही दिवस 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले होते, परंतु मध्यंतरी हे लसीकरण बंद करण्यात आले. मात्र ज्या नागरिकांनी कोवॅक्स‍िनचा पहिला डोस घेतला होता, अशा नागरिकांना विहित मुदतीत दुसरा डोस देणे गरजेचे होते, यासाठी महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला लेखी सूचनेद्वारे कोवॅक्स‍िनच्या दुसऱ्या डोसचे लसीकरण सुरू करावे असे निर्देश सोमवारी (7 जून) दिले होते. त्यानुसार महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दखल घेवून उद्यापासून (9जून) ठाणे ग्लोबल कोविड सेंटर येथे ऑनलाईन पध्दतीने लसीकरण मोहिम सुरू केले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात 1 ते 12 मे 2021 या कालावधीत 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांना पहिला डोस देण्यात आला होता. परंतु शासनाच्या निर्देशानुसार सदर लसीकरण बंद करण्यात आले होते. आयसीएमआरच्या निर्देशानुसार विहित मुदतीत कोवॅक्स‍िनचा दुसरा डोस घेणे गरजेचे आहे, ही मुदत संपल्याने अनेक नागरिकांमध्ये संभ्रमाचे व भीतीचे निर्माण झाले होते तसेच नागरिक सातत्याने याबाबत महापौरांना विचारणा करीत होते. 1 ते 12 मे या कालावधीत ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण 6,614 नागरिकांना कोवॅक्स‍िनचा पहिला डोस देण्यात आला होता. ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना दुसरा डोस देण्यास सुरूवात केली होती, या पार्श्वभूमीवर महापालिकेने देखील सदरचे लसीकरण सुरू करावे असे निर्देश महापौरांनी प्रशासनाला दिले होते.

महापौरांनी दिलेल्या निर्देशाची तातडीने दखल घेवून महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांना कोवॅक्स‍िनचा दुसरा डोस ग्लोबल कोविड सेंटर येथे देण्याबाबतचे नियोजन केले आहे. हे लसीकरण ऑनलाईन पध्दतीने होणार असून उद्या (9 जून) एकूण 1000 डोस देणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. खुशबू टावरी यांनी दिली.

 महापालिकेने सुरू केलेल्या कोवॅक्स‍िनच्या दुसऱ्या डोससाठी 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांनी ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करुन लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी केले आहे.

 426 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.