ठाणे – सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी समाजाला असलेले राजकीय आरक्षण रद्द केल्याच्या निशेर्धात गुरुवारी ठाण्यात भाजपच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन केले. यावेळी राज्य सरकारच्या चुकीमुळे हे आरक्षण रद्द झाल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
सर्वोच्च न्यायालयाने १२ डिसेंबर २०१९ रोजी या संदर्भात काही आदेश दिले होते. परंतु या आदेशाला १५ महिने उलटून गेल्यानंतरही राज्य शासनाने याकडे गांभीर्याने न घेतल्याने हे आरक्षण रद्द होण्याची वेळ आल्याचे मत यावेळी भाजपच्या वतीने व्यक्त करण्यात आले. ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे ठाणो शहर जिल्हाअध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत हे बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आरक्षणाच्या बाबतीतील महाविकास आघाडीचे धोरण स्पष्ट दिसत आहे. ओबीसीला आरक्षण द्यायचे नाही, दिलेले आरक्षण हिरावून घेण्याचे काम सुरु आहे. ज्या मंत्र्यांनी यासाठी पुढाकार घेतला होता, त्यांचा आवाज दाबला गेला आहे. त्यामुळे त्यांनी आपली भुमिका स्पष्ट करावी अशी मागणी यावेळी जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी केली. तर महाविकास आघाडी अंत्यत निष्क्रीय आहे, १५ महिने झाले तारीख पे तारीख घेत बसले, त्यामुळे ओबीसी समाजाला या महाविकास आघाडी सरकारने रस्त्यावर आणले आहे. त्यामुळे आता आरक्षण मिळविण्यासाठी भाजप रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा यावेळी आमदार संजय केळकर यांनी दिला.
395 total views, 1 views today